आवश्यक व दर्जेदार सोयाबीन बियाणे पुरवठा व्हावे
पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्याकडून कॅबिनेटमध्ये मागणी
अमरावती/दि. २८ – अमरावती जिल्ह्यात व विभागात सोयाबीन हे प्रमुख पीक असून, आगामी खरीप हंगामात दर्जेदार सोयाबीन बियाण्याचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी महाबीज व खासगी कंपन्यांना निर्देश देण्याची विनंती महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेटमध्ये मांडली.
या मागणीचे निवेदनही पालकमंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी मंत्री दादाजी भुसे यांना दिले आहे.
अमरावती विभागात सोयाबीन हे प्रमुख पीक असून, सध्या सोयाबीनचे बाजारभाव पाहता सोयाबीन पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहणार आहे. अमरावती जिल्ह्यात सोयाबीनसाठी २.७० लाख हेक्टर क्षेत्र अपेक्षित असून मागील वर्षी १.२५ लाख क्विंटल बियाण्याची विक्री जिल्ह्यात झाली. त्या अनुषंगाने येत्या हंगामासाठी १.३० लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे.
-
जादा पावसाने गत हंगामात सोयाबीनची प्रत खालावली
मागील हंगामात कापणीच्या वेळी पावसामुळे सोयाबीनची प्रत खालावली. त्याची परिणती चांगल्या घरगुती बियाण्यात घट होण्यात झाली. घरगुती सोयाबीनची कमी उपलब्धता लक्षात घेता येत्या खरीप हंगामासाठी अमरावती विभागात दर्जेदार बियाण्याचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी महाबीज व खासगी कंपन्यांना शासन स्तरावरून आदेश व्हावेत, अशी विनंती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री व कृषी मंत्र्यांना केली आहे.
-
गुणवत्तापूर्ण बियाण्याचा पुरवठा आवश्यक
खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्र्यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीद्वारे घेतला होता. गत हंगामात सोयाबीनच्या उगवणबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसे पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजनेची भरीव अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार दर्जेदार बियाण्याच्या पुरेशा उपलब्धतेसाठी शासन स्तरावर पाठपुरावा होत आहे.