मराठी

मत मोजणी स्थगितीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अमेरिकन अध्यक्षपद निवडणूक

वॉशिंग्टन/ दि,७  – अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत या वेळी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात स्पर्धा आहे. सलग तीन दिवस मतमोजणी होत आहे, परंतु अद्याप स्पष्ट निकाल लागलेला नाही. तथापि, जो बायडेन विजयाच्या जवळ आले आहेत. जॉर्जिया आणि पेनसिल्व्हेनिया या महत्त्वपूर्ण राज्यांमध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकले आहे. बायडेन आता ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या अगदी जवळ दिसतात. आत्ता त्यांना 264 मतदार मते मिळाली आहेत, तर ट्रम्प यांना 214 मते मिळाली आहेत. अध्यक्ष होण्यासाठी 270 मतदार मते मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने उशिरा झालेल्या मतगणनेवर बंदी घालण्यास नकार दिला आहे.
पेनसिल्व्हेनियाच्या रिपब्लिकन सदस्यांनी केलेली विनंती शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी निवडणूक दिवसानंतर आलेल्या मतपत्रिकांच्या मतमोजणीवर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली. एकल न्यायाधीश खंडपीठाने हे प्रकरण संपूर्ण कोर्टाकडे पाठविले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सॅम्युअल लिटो यांनी पेनसिल्व्हानिया प्रशासनाला उशीरा आलेल्या मतपत्रिका बाजूला ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यातील बहुतेक बॅलेट्स बायडेन यांच्या बाजूच्या असल्याचे समजते. रिपब्लिकन पक्षाने पेनसिल्व्हेनिया राज्य कायद्यांतर्गत या मतपत्रिकांना अयोग्य ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. रिपब्लिकन पक्षाची इच्छा होती, की न्यायालयाने निवडणुकीच्या दिवशी रात्री आठ नंतर आलेल्या मतपेटया अन्य मतपत्रिकांपासून वेगळे ठेवण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती.
बायडेन यांनी पहिल्यांदा विजयाचा दावा केला. जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यांशी लढा असणा-या पाचपैकी चार राज्यात आघाडी घेतली आहे. त्यांनी शनिवारी पहिल्यांदा जनतेला संबोधित केले. बायडेन यांनी विजयाचा दावा केला. प्रत्येकाचे मत मोजले जाईल. कितीही लोकांनी हे थांबवण्याचा प्रयत्न केला, तर मी हे होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. बायडेन यांनी ज्या राज्यात आघाडी घेतली आहे, त्यात जॉर्जिया, पेनसिल्व्हेनिया, रिझोना आणि नेवाडा यांचा समावेश आहे. जॉर्जिया वगळता बायडेन यांनी उर्वरित राज्यांत चांगली आघाडी घेतली आहे. तरीही संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर ते बहुधा अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. जॉर्जियामध्ये मोजणीच्या दुस-या फेरीनंतर बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर आघाडी घेतली. हा प्रदीर्घ काळ रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे. बायडेन आता 1096 मतांनी पुढे आहे. त्याच वेळी, पेनसिल्व्हेनियात बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर पाच हजार 587 मतांनी आघाडी मिळविली. अ‍ॅरिझोना आणि नेवाडा या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये बायडेन किरकोळ मतांनी आघाडीवर आहेत.

Related Articles

Back to top button