सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महाराष्ट्र सरकारला धक्का
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास
नवी दिल्ली/दि. १९ – अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा तसेच बिहारमधील एफआयआर वैध ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महाराष्ट्र सरकारला धक्का बसला आहे. या प्रकरणात आतापर्यंत जुळवाजुळव केलेले सर्व पुरावे आणि केस सीबीआयला वर्ग करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सुशांतच्या वडीलांच्या तक्रारीच्या आधारावर पाटण्यामध्ये दाखल केलेला एफआयआर वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. हा एफआयआर चौकशीसाठी सीबीआयला वर्ग करण्याचा अधिकार बिहार सरकारला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सीबीआय फक्त पाटणामध्ये दाखल झालेलाच नव्हे, तर या प्रकरणातील इतर एफआयआरचा तपास करण्यासाठीही सक्षम असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.
सीबीआय या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकमेव संस्था आहे, यात कोणतीही शंका नाही आणि कोणत्याही राज्याच्या पोलिसांनी तपासात हस्तक्षेप करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर फक्त अपघातील मृत्यू अशी नोंद केली होती, त्यामुळे तपासात मर्यादा होत्या. बिहार पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे, ज्याच्या आधारावर सीबीआयला चौकशी देण्यात येत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी आणि मुंबई पोलिसांसोबतही तपासात सहकार्य केले आहे. त्याचप्रमाणे सीबीआय चौकशीतही तिचे सहकार्य असेल. कोणत्याही तपास यंत्रणेने तपास केला तर सत्य आहे तसेच राहील, असे तिने सांगितल्याचे वकील सतीश मानेqशदे म्हणाले.
महाराष्ट्र सरकार लवकरच जाणार
भाजप नेते संबित पात्रा यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील महाआघाडीचे सरकार लवकरच कोसळणार आहे, असा इशारा त्यांनी एका ट्विटद्वारे दिला आहे. भाजपचे प्रवक्ता असलेले संबित पात्रा यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे,‘पहले महाराष्ट्र सरकार सो‘रिया‘ था, फिर संजय राऊत सुशांत परिवार को धो ‘रिया‘ था, अब मुंबई में सरकार रो ‘रिया‘ हैं, दोस्तो जल्दी ही सुनेंगे महाराष्ट्र सरकार जा ‘रिया‘ हैं, असे त्यांनी म्हटले आहे.
पार्थचे ‘सत्यमेव जयते‘!
राज्य सरकारने सुशांतqसहचा तपास बिहार पोलिस आणि सीबीआयकडे देण्यास विरोध केला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर ठाम विरोध केला होता. या पाश्र्वभूमीवर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी पार्थवर कठोर भाषेत टीका केली होती. आता सीबीआयचा निकाल आल्यानंतर पार्थ यांनी ‘सत्यमेव जयते‘ म्हणत राज्य सरकारविरोधात भूमिका घेतली आहे.