नवी दिल्ली/दि. २६ – राजधानी दिल्लीत संसद(Parliament Building) भवनाजवळ एका संशयित तरुणाला सुरक्षा दलांनी(CRPF) ताब्यात घेतले आहे. तो काश्मीरचा रहिवासी असून त्याच्या जवळ कोडवर्ड लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. विजय चौकात संशयास्पद स्थितीत फिरतांना त्याला केंद्रीय राखीव दलाने ताब्यात घेतले आहे. चौकशीत तो वेग वेगळी माहिती देत असल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. संसदभवन परिसर हा हाय सेक्युरेटी झोन असल्याने असा युवक सापडल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी या युवकाला ताब्यात घेतल्यानंतर संसद भवन मार्ग पोलिस ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे.
या चौकशी दरम्यान त्याने वेगवेगळी माहिती दिली आहे. त्याच्या जवळ आधार कार्ड आणि वाहन चालविण्याचा परवाना आहे; मात्र त्या दोन्हीवर त्याची नावे वेगवेगळी आहेत.वाहन चालविण्याच्या परवान्यावर त्याचे नाव फिरदौस असे असून आधार कार्डावर त्याचे नाव मंजूर अहमद अहंगेर असे आहे. तो दिल्लीत कुठे राहतो आणि कधी आला याबद्दलही त्याच्या माहितीत तफावत आढळून आली आहे. पोलिसांना त्याच्या बॅगमध्ये एक चिठ्ठी सापडली असून त्यावर काही कोडवर्ड लिहिल्याचेही आढळून आले आहे. ते नेमके काय आहे याचे डिकोडींग करण्याचे कामही करण्यात येत आहे. काश्मीरमधील बडगाम येथील तो रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. आयबीसह गुप्तचर संस्था आणि पोलिस त्याची चौकशी करत आहे.