वरुड/दि.२७ – भरधाव व अनियंत्रीत स्विफ्ट कारने ट्रकला मागुन दिलेल्या धडकेत कारचालकाचा मृत्यू तर एक गंभिर जखमी झाल्याची घटना नागपुर मार्गावरील ढगा गावाजवळ काल (ता.२६) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी वरुड पोलिसांनी कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत प्राप्त माहीतीनुसार, एम.एच.४० एके ३७९१ क्रमांकाचा ट्रक नागपुरहून वरुडकडे येत असतांना ढगा गावानजीक मागुन एम.एच.४० बीई ५६४८ क्रमांकाच्या भरधाव व अनियंत्रीत स्विफ्ट कारने ट्रकला मागुन जोरदार धडक दिली. या धडकेत योगेश महादेव धाबेकर वय २२ रा.होळी मैदान, काटोल याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर हेमंत हिरामन सावरकर वय २८ रा.चांडकनगर काटोल हा गंभिररित्या जखमी झाला.
अपघात झाल्याचे लक्षात येतात ढगा, एकदरा, घोराड, आमनेर गावातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली आणि ट्रकच्या खाली घुसलेली कार काढून जखमी आणि मृतकाला बाहेर काढले. या अपघातात गंभिर जखमी झालेल्या हेमंत सावरकर याला गंभिरावस्थेत ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत वरुड पोलिसांना माहीती मिळताच ठाणेदार मगन मेहते, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दिलीप श्रीराव, मिलींद वाटाने यांचेसह इतर पोलिस कर्मचा:यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता रवाना केला.
याप्रकरणी ट्रकचालक अ.साजीक अ.खालीक (देशमुख) (३५), रा.चौबारा चौक, देशमुखपुरा जळगाव (जामोद) यांचे फिर्यादीवरुन कारचालक योगेश महादेव धाबेकर (२२) रा.होळी मैदान काटोल याचे विरुध्द भादंवि २७९, ३३७, ६०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दिलीप श्रीराव करीत आहेत.