मराठी

टाटा समूहाची रिलायन्सवर मात

मुंबई/दि.१४ – गेल्या जुलैत टाटा समूहाला मागे टाकत रिलायन्स समूह देशातील सर्वांत मोठे व्यावसायिक घराणे ठरले होते; मात्र त्यांना हा मान सहा महिनेही टिकवता आला नाही. मुकेश अंबानींचा रिलायन्स समूह बाजारमूल्याबाबत आता तिसर्‍या स्थानी आहे. दुसरीकडे, टीसीएसच्या शानदार कामगिरीमुळे टाटा समूह पुन्हा सर्वात मोठे व्यावसायिक घराणे बनले.
वित्तीय शेअर्समधील तेजीमुळे एचडीएफसी समूह देशातील दुसरा सर्वात मोठा समूह बनला आहे. तथापि, रिलायन्स आजही देशातील सर्वांत मोठी कंपनी आहे. जुलै 2020 मध्ये टाटा ग्रुपच्या 17 नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप11.32 लाख कोटी रुपये होते. 16 सप्टेंबरला रिलायन्सच्या मार्केट कॅपने 16 लाख कोटींची पातळी गाठली; मात्र त्यानंतर रिलायन्सचे शेअर गडगडू लागले. आता त्यांचे मार्केट कॅप12.22 लाख कोटींवर आले आहे. दरम्यान, टाटा ग्रुपच्या टाटा मोटर्स व टाटा स्टील कंपन्यांतील तेजीमुळे समूहाचे एकूण मार्केट कॅप16.69 लाख कोटी पार पोहोचले. ते रिलायन्स समूहापेक्षा सुमारे 36 टक्क्यांनी जास्त आहे.
टीसीएसने कोरोनाकाळात अनेक मोठे करार केल्याने कंपनीच्या शेअर्समधील तेजी कायम आहे. दुसरीकडे स्टील दरवाढीने टाटा स्टीलचा फायदा झाला. टाटा मोटर्सचे शेअर्सही जुलैनंतर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. फेसबुक, गुगलकडूनही मोठी गुंतवणूक मिळवल्यामुळे रिलायन्सचे शेअर्स वधारले होते. त्यात आता करेक्शन येण्यास सुरुवात झाली आहे. अरामको करारावरील प्रश्नचिन्हाने गुंतवणूकदारांची भावना बदलली. सप्टेंबरनंतर समूहाचे शेअर्स 20 टक्क्यांपर्यंत गडगडले आहेत.
एचडीएफसी समूहाच्या चार कंपन्या नोंदणीकृत आहेत. त्या सर्व वित्तीय सेवांशी निगडित आहेत. नोव्हेंबरमध्ये मोरोटोरियमशी निगडित कोर्टाचा निकाल आल्यानंतर वित्तीय कंपन्यांत तेजी येण्यास सुरुवात झाली होती. यामुळे या समूहाचे एकूण मार्केट कॅप वेगाने वाढले आहे. एकापाठोपाठ एक नव्या गुंतवणुकीमुळे रिलायन्सचे शेअर्स वास्तविक मूल्यापेक्षा महाग झाले होते. टाटांच्या टीसीएस, टाटा मोटर्स व टाटा स्टील या तीन मोठ्या कंपन्यांत एकाच वेळी आलेल्या तेजीमुळे समूह वेगाने पुढे गेला.

 

Related Articles

Back to top button