चहा. तांदळाच्या निर्यातीला सरकार देणार पॅकेज
नवीदिल्ली/दि.५ – चहा, तांदूळ यांसारख्या कृषी उत्पादनांच्या निर्यातदारांना सरकार मदत देण्याच्या तयारीत आहे. सरकार पुढील मदत पॅकेजमध्ये त्यांच्यासाठी एक विशेष योजना आणणार आहे, जेणेकरून त्यांना येत्या पाच वर्षांत 26 लाख कोटी रुपयांचे कर्ज मिळेल.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चहा-तांदूळ यांसारख्या कृषी निर्यातीस चालना देण्यासाठी चहा, तांदूळ निर्यातीवर अधिक अनुदान मिळणे शक्य आहे. सरकार यासाठी अॅग्रो एक्सपोर्टर्सला प्रीमियम सबसिडी देईल. सूत्रांच्या माहितीनुसार चहा-तांदूळ यांसारख्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यातदारांच्या नव्वद टक्के कर्जाचा विमा उतरविला जाईल. यावर विमा प्रीमियमचा काही भाग सरकार देईल. म्हणजेच 90 टक्क्यांपर्यंत कर्जाचा विमा काढली जाईल. वाढत्या निर्यातीवर सोपी कर्ज योजनाही उपलब्ध होईल.
अॅग्रो प्रॉडक्ट्सच्या निर्यातदारांसाठी पाच वर्षांत सुमारे 26 लाख कोटी रुपयांचा निर्यात पत अंदाज आहे. यासाठी आठ हजार कोटी रुपयांची विशेष योजना प्रस्तावित आहे. अर्थ सचिव अजय भूषण पांडे म्हणाले, की अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत आणि लवकरच सरकार आणखी एका मदत पॅकेजवर निर्णय घेऊ शकेल. कर वसुलीमुळे अडचणीत सापडलेल्या क्षेत्राविषयी सरकारला माहिती आहे. पुढील मदत पॅकेज दबावग्रस्त क्षेत्रावर लक्ष केंद्रित करेल. पर्यटन, हॉटेल्स यांसारख्या क्षेत्रांची स्थिती चांगली नाही. अशा तणावग्रस्त क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करून सरकार लवकरच दिलासा देण्याचा निर्णय घेईल.