कोल्हापूरः दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या तीन महिन्यांची वीज देयके माफ करण्यात यावीत व या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनांच्या वतीने दहा ऑगस्ट रोजी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करावे, असे आवाहन प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, प्रताप होगाडे, आर. के.पोवार व सर्वपक्षीय प्रमुखांनी केले आहे.
या मागणीसाठी प्रथम १३ जुलै रोजी राज्यस्तरीय वीजबिल होळी आंदोलन जाहीर करण्यात आले होते. हे आंदोलन राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये, कांही ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये, अनेक गावांमध्ये व मुंबईसह अनेक महापालिका क्षेत्रात झाले. या आंदोलनानंतर राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांना वीजबिलांमध्ये २० ते ३० टक्के सवलत देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. तथापी ही तोकडी सवलत वीज ग्राहकांना मान्य व दिलासा देणारी नाही. आजच्या कोरोना सद्यस्थितीत त्यांच्या अडचणींवर आणि दुःखावर मीठ चोळणारी असल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील ८० टक्के हून अधिक वीज ग्राहकांची धड खायला नाही, अशी भ्रांत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने संपूर्ण वीजबिल माफी करावी, अशी वीज ग्राहकांची मागणी आहे. त्यामुळे हे तीन महिन्यांचे वीजबिल ग्राहक भरणार नाहीत असा निर्धार करण्यात आला. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलेल्या ‘दरमहा शंभर युनिटसच्या आतील ग्राहकांना मोफत वीज’ या घोषणेची त्वरित अंमलबजावणी करावी, अशीही मागणी करण्यात आली.