मराठी

मतांच्या रस्सीखेचीमुळे पश्चिम बंगालमध्ये तणाव

कोलकात्ता/दि.१४  पश्चिम बंगालमध्ये बहुतांश ठिकाणी तृणमूल काँग्रेस व भाजप समर्थकांत तणाव वाढत चालला आहे. एका एका मतासाठी दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू असून त्यामुळे हिंसाचार वाढत आहे.
तृणमूल काँग्रेस प्रत्येक बूथवर १० दहा कार्यकर्त्यांची नियुक्ती करत आहे. भाजपने आतापर्यंत ८१ हजारांपैकी ६५ हजार बूथवर किमान एका कार्यकर्त्याची नियुक्त केली आहे. कोलकाताच्या तोपसिया मार्गावरील तृणमूल भवन व हेस्टिंग्ज येथील भाजपचे प्रचार कार्यालय बंगालच्या राजकारणाचे हाॅट सेंटर बनले आहे. तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी यांच्या चेहऱ्यावर, तर भाजप मोदींच्या नावे निवडणूक रिंगणात आहे. या सर्व संघर्षात काँग्रेस, डावे पक्ष मुख्य लढतीत नाहीत; परंतु अटीतटीच्या प्रसंगी निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या वेळी या पक्षांची मदत घेतली जाऊ शकते. उज्ज्वल बंगाल घडवण्याचे स्वप्न प्रत्येक पक्ष मतदारांना दाखवत आहे. दोन्ही पक्ष सोशल मीडियाचा जोरदार वापर करत आहेत.
रवींद्र भारती विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राेफेसर व राजकीय विश्लेषक विश्वनाथ चक्रवर्ती म्हणाले, की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १८ जागांवर  भाजप जिंकला. त्यामुळे येथील भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. काँग्रेस, डाव्या पक्षांचा पाठिंबा कमी होण्याची चिन्हे आहेत. आगामी काही आठवड्यांत समर्थक आणखी घटू शकतात. पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतांचे महत्त्व आहे. सीएसडीएसनुसार राज्यातील सुमारे १२५ विधानसभा जागांवर २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मुस्लिम मते आहेत. ४३ जागांवर ५० टक्क्यांहून जास्त मुस्लिम मते आहेत. सर्वाधिक ९७ टक्के मुस्लिमबहुल मतदारसंघ म्हणून डोमकाल ओळखले जाते. भगबानगोलामध्ये ८८ टक्के मुस्लिम मतांचा दबदबा आहे. असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष व माैलाना अब्बास सिद्दिकी येथे निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
तृणमूल, काँग्रेस, डाव्या पक्षांतील १०० हून जास्त नेते भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. पक्षाचे राज्य प्रभारी व महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा दोन वेळा दाैरा केला आहे. विजयवर्गीय म्हणाले, की  ८१ हजारपैकी ६५ हजार मतदान केंद्रांवर कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. स्थानिक कार्यकर्ते व नेतेच निवडणुकीचे संचालन करत आहेत. क्षेत्रीय पातळीवर बाहेरचे नेते मार्गदर्शन करतील.

Related Articles

Back to top button