‘टेस्ला’ची अखेर भारतात एन्ट्री !
बंगळूर/ दि.१३ – सजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतामध्ये एन्ट्री झाली आहे. या अमेरिकन कार कंपनीने आपल्या भारतातील पहिल्या कार्यालासाठी बंगळूरची निवड केली आहे. यापूर्वी मस्क यांनी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. अखेर त्यांनी टेस्लाची आठ जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला कंपनीने बंगळूरमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात टेस्ला कंपनीचे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच ठिकाणी कंपनीचे संशोधन आणि विकास ऑफिसदेखील असेल. ‘टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी’ असे भारतातील कंपनीला नाव देण्यात आले आहे. यासाठी कंपनीने भारतामधील कामकाज पाहण्यासाठी तीन संचालकांची नियुक्ती केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी टेस्लाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की कर्नाटक ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने भारताला घेऊन जाईल. इलेक्ट्रिक व्हेइकल मॅन्युफॅक्चरर टेस्ला लवकरच बंगळूरमध्ये संशोधन आणि विकास युनिटद्वारे आपले काम सुरू करणार आहे.
यापूर्वी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर 2020 मध्ये टेस्ला भारतात येणार असल्याचे म्हटले होते. गडकरी म्हणाले होते, की, अमेरिकेतील ऑटो क्षेत्रातील मोठी कंपनी टेस्ला पुढील वर्षी भारतात आपल्या कारच्या वितरणासाठी केंद्र सुरू करणार आहे. मागणीच्या आधारावर कंपनी येथे वाहन निर्मितीचा कारखाना सुरू करेल. पुढील पाच वर्षात जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक वाहन उत्पादक बनण्याची क्षमता भारतात आहे.