मराठी

महात्मा गांधींची १५१ वी जयंती एक आठवडाभर साजरी होणार

  • 2 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचे ई लोकार्पण

  • गांधी विचार धारेवर आधारित विविध वेबिनारचे आयोजन

वर्धा, दि 28:-  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती 2 ऑक्टोबरला साजरी होणार आहे. 21 व्या शतकातही महात्मा गांधींचे विचार प्रस्तुत आहेत. कोरोनामुळे आपल्याला भव्यदिव्य कार्यक्रम करता येत नसला तरी त्यांचे विचार जगभर पोहचविणे आणि जगभरात त्यांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या लोकांशी जोडून घेणारा कार्यक्रम 2  ते 8 ऑक्टोबर दरम्यान आयोजित होणार आहे. तसेच सेवाग्राम आराखड्यातील विकास कामांचे ई लोकार्पण राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषेदेला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना पालकमंत्री श्री केदार  म्हणाले, 2 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता गांधी पुतळा ते सेवाग्राम आश्रम पर्यंत  पदयात्रा  होणार आहे.  10 वाजता हॉकर्स प्लाझा येथील स्टोलचे उदघाटन,  सकाळी 12 वाजता महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रेक्षागार सभागृहात आराखड्यातील विकास कामांचे ई लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी 6 वाजता दीपोत्सव आहे.
3  ऑक्टोबरला गांधी विचारधारेवर आधारित वेबिनार, 4 ऑक्टोबरला बचत गटामार्फत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेबिनार आणि यशोगांथांचे सादरीकरण तसेच  अनुभवांचे आदानप्रदान, 5 ऑक्टोबरला कौशल्य विकासावर आधारित कार्यशाळा, महात्मा गांधींनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे खरोखरीच श्रमाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार 6 ऑक्टोबरला होणार आहे. 7 ऑक्टोबरला संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येईल, त्याची सुरुवात सेवाग्राम गावापासून करण्यात येईल. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ यांच्या वतीने 8 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेबिनार आयोजित होणार आहे. यात जर्मनी, दक्षिण अफ्रिका, मॉरिशस  येथील प्रतिनिधी सहभागी होतील. त्याचबरोबर कस्तुरबा हेल्थ सोसायटीतर्फे संपूर्ण आठवडाभर आरोग्य तपासणी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री केदार यांनी दिली.
राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी या जनजागृती अभियानाअंतर्गत  आरोग्य पथकामार्फत तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आता पर्यंत 1 लक्ष 35 हजार 516 लोकसंख्येची  तपासणी  झाली आहे. 25 ऑक्टोबर पर्यंत ही मोहीम चालणार असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या आरोग्य पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.

Related Articles

Back to top button