मराठी

केन्द्र तसेच राज्य सरकारच्या मदतीच्या घोषणा फोल ठरल्या

सरकारच्या दुर्लक्षीत धोरणाने शेतक-यांची दिवाळी अंधारात- सिकंदर शहा

यवतमाळ दि १२ – अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे विदर्भातील शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. यादरम्यान केन्द्र तसेच राज्य सरकारने मदतीच्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात केन्द्र तसेच राज्य सरकारची कुठलीच मदत न मिळाल्याने त्यांनी केलेल्या मदतीच्या घोषणा फोल ठरल्याची टिका शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केली आहे. शेतक-यांची दिवाळी अंधारात जाण्याला राज्य तसेच केन्द्र सरकार जबाबदार असल्याची परखड टिका सुध्दा त्यांनी व्यक्त केली आहे.
यावर्षी सतत पाऊस पडल्याने यवतमाळ जिल्हयातील सोयाबिनचे संपुर्ण पिक नष्ट झाले. कसेबसे कापसावर असलेली भिस्त सुध्दा फोल ठरली. अतिवृष्टीमुळे कापसाची बोंड मोठया प्रमाणात काळवंडली. आता उर्वरीत बोंडावर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविला आहे. कुठलेही बोंड फोडले तरी आतमध्ये अळी असल्याचे दिसून येत असल्याने शेतकरी सर्व झाडे उपडून फेकत आहे. एैन दिवाळीच्या तोंडावर कपाशीची झाडे काढून फेकतांना शेतक-यांच्या डोळयात अश्रृ येत आहे. केन्द्र सरकारने मदत देण्याची घोषणा केली मात्र एक रुपयाही शेतक-यांना अद्याप दिला नाही. राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयांची मदत घोषीत केली मात्र विदर्भातील दहा जिल्हे अतिवृष्टीमधून वगळून टाकले. त्यामुळे फक्त विदर्भाच्या वाटयाला 7 कोटी 32 लाख रुपये आले आहे. पिक काढतांना आलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतक-यांना देण्यात येणार असल्याच्या नुसत्याच वल्गना केल्या जात आहे. प्रत्यक्षात मदत कवडीचीही दिली जात नाही. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. यवतमाळ जिल्हयातील 4 लाख 67 हजार शेतक-यांनी पिकविमा काढला मात्र फक्त 8 हजार 345 शेतकरीच मदतीसाठी पात्र ठरले आहे. दिवाळी उजाडली तरी शेतक-यांच्या खात्यात शासनाची मदत पोहोचली नाही. राज्य तसेच केन्द्र सरकारच्या या अशा दुर्लक्षीत धोरणामुळे शेतक-यांच्या मनात उद्रेक असून त्याचा कधीही विस्फोट होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही सरकारने शेतक-यांचा सहानुभूतिपुर्वक विचार करुन तातडीने मदत देण्याची मागणी सिकंदर शहा यांनी केली आहे.

  • शेतकरी नेत्यांनो जागे व्हा

विदर्भातील शेतक-यांवर राज्य तसेच केन्द्र सरकार अन्याय करीत आहे. प्रचंड नुकसान झाले असतांनाही मदत कुठलीच मिळालेली नाही. अशा अवस्थेत शेतक-यांमध्ये नैराश्य आले असून शेतकरी नेतेही आवाज उचलतांना दिसून येत नाही. शेतक-यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात विदर्भातील शेतकरी नेत्यांनी एकत्रित होऊ लढा उभारण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने आमची तयारी सुरु आहे.

 

 

Back to top button