मराठी

जुन,जुलै, ऑगस्ट तीन महिन्यात सरासरी ६८०.३ मिमि पाऊस

२४ तासात १०.८ मिमि पाऊस

अमरावती प्रतिनिधी/ २० :- यावर्षी जुन पासूनच पावसाला सुरुवात झाली, एरव्ही अध्र्यापेक्षा अधिक जून महिना कोरडा जात असतो व शेतकरी याच महिन्यात पेरणीला सुरुवात करतात, कारण जून महिन्यात पेरणी झाल्यास पुढे चांगले पिक येते. परंतू गतवर्षी अख्खा जून महिना कोरडा गेला व जुलै महिन्यात सुरु झालेल्या पावसाने नंतर उसंत न घेता संततधार सुरु ठेवली आणि नगदी पीक असलेल्या सोयाबिनचा पुरता धुव्वा उडवला. अनेक शेतक-यांचे सोयाबिन खराब झाले, काहींचे सडले, तर अनेक भागात शेतातच पूर्णत: सडून वाया  गेल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षीही पावसाने चांगला दिलासा दिला खरा, परंतू सततच्या पावसाने पिकाला पोषक वातावरणच तयार झाले नाही व डवरणी, खुरपणी अशी कामेही सततच्या पावसाने रखडली. त्याचा परिणाम याहीवर्षी सोयाबिन पिकावर मोठ्या प्रमाणात झाला.आधी बियाणे उगवले नाही, तरीही खर्च करुन शेतक-यांनी पेरण्या केल्या, पण सततच्या पावसाने सोयाबिनवर वेगवेगळ्या रोगांचे आक्रमण होऊन सोयाबिन पीक शेतक-यांच्या हातातून गेले. अनेक शेतक-यांनी सोयाबिनला शेंगाही धरत नसल्याचे पाहून जनावरांचा चारा म्हणून ते उपयोगात आणावे लागले. पाण्याची भरमार झाली, धरणे, नदी-नाले तुडूंब भरले, पण दुसरीकडे ज्याच्यावर पोट चालते ते पिकच सततच्या पावसाने खराब झाल्याने याही वर्षी पावसाने शेतक-यांचे नुकसानच केले.जिल्ह्यात जून , जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यातच पावसाने सरासरी गाठली. मुख्य म्हणजे यावर्षीही फारशी उघडीप पावसाने घेतली नाही व एक -दोन दिवस उघडीप नंतर पुन्हा तुफानी पाऊस बरसला. जिल्ह्यातील चवदाही तालुक्यामध्ये जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्याच्या कालावधीत ६८०.३ मिमि पाऊस झाला. तर विभागात ६३०.२ व गेल्या २४ तासात जिल्ह्यात १०.८ व विभगात ८.६ मिमि पाऊस झाला. तर आतापर्यंत जिल्ह्यात ७७० मिमि., तर विभागात ७२५.४ मिमि पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील चवदाही तालुक्यापैकी वरुड तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक  ९३१.७ मिमि पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी २० सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात  ६९८.७ मिमि पाऊस झाला होता. यावर्षी मात्र पावसाने ही सरासरी ओलांडली.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेला तहसिलनिहाय पाऊस: धारणी ६८७.२ मिमि, चिखलदरा ७५३.१ मिमि, अमरावती ७५७.१ मिमि.,भातकुली  ७८६.६ मिमि., नांदगाव खंडेश्वर ८९७.७ मिमि., चांदूररेल्वे ७२९.६ मिमि., तिवसा ६८१.४ मिमि., मोर्शी ७८६.८ मिमि., वरुड ९३१.७ मिमि., दर्यापूर ८१६.४ मिमि., अंजनगाव सुर्जी ७२६.५ मिमि., अचलपूर६३१.२ मिमि., चांदूरबाजार ७८८.० मिमि., धामणगाव रेल्वे ६९३.२ मिमि. अशी पावसाची नोंद झाली आहे. विभागातही गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी अधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी अमरावती विभागात आजच्या तारखेपर्यंत ६४५.३ मिमि. (९१.४ टक्के)  पावसाची नोंद झाली होती. यावर्षी ७२५.४ मिमि. (१०२.७ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.

Related Articles

Back to top button