नांदेड/दि.२ – केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. देशावर जेव्हा ब्रिटिशांचे राज्य होते तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने भारताची लूट केली. आता भाजपा म्हणजे नवी ईस्ट इंडिया कंपनीच आहे अशी टीका काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. नांदेडमध्ये बोलत असताना त्यांनी ही टीका केली आहे. ब्रिटिशांच्या काळात ईस्ट इंडिया कंपनी होती. या कंपनीने आपला देश लुटला, सगळा मुद्देमाल तिकडे घेऊन गेले. आजच्या घडीला भाजपाच्या रुपाने नवी ईस्ट इंडिया कंपनीच सुरु झाली आहे. काही व्यापारी एकत्र आले आहेत आणि भाजपाच्या साथीने देश लुटत आहेत अशी घणाघाती टीका अशोक चव्हाण यांनी केली. केंद्र सरकारच्या नव्या कृषी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात असलेला प्रचंड असंतोष देशभरातल्या आंदोलनांच्या माध्यमातून दिसून आला. नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारने आणलेले नवे कायदे हे शेतकऱ्यांसाठी घातक आहेत. त्यामुळे होणारे नुकसान आज दिसत नसले तरीही पुढे दिसून येईल. त्यामुळे महाराष्ट्राच्या पातळीवर शेतकरी व कामगारांच्या हितांचे रक्षण करणारे कायदे करण्याची आमची भूमिका आहे. आम्ही त्यासंदर्भातली मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
हाथरस प्रकरणावरुनही टीका
उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना माध्यमांपासून दूर ठेवण्यात आलं आहे. कुटुंबीयांशी बोलणं तर दूर पण पत्रकारांना गावात प्रवेशही दिला जात नाही. पीडितेचा एक नातेवाईक सांगतो आहे की आम्हाला नजरकैदेत ठेवलं आहे. यावरुन हे स्पष्ट आहे की या प्रकरणात काहीतरी लपवलं जातं आहे असाही आरोप अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केला.