मराठी

फोडणीचा तडका होणार सुसह्य

मुंबई/दि.१५ –  सोयाबीन आणि मोहरीच्या तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून विक्रमी किंमतीत विकल्या जाणा-या खाद्य तेलांच्या किंमती लवकरच आटोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळू शकेल.
पाम आणि सोयाबीन तेलाचे दर कमी होणे अपेक्षित आहे. तथापि, किरकोळ  भाव कमी होण्यासाठी एका महिन्याहून अधिक कालावधी लागू शकेल. गेल्या काही महिन्यांत खाद्यतेलाच्या किंमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. पाम तेलापासून शेंगदाणे, मोहरी, सोयाबीन अशा सर्व खाद्य तेलांच्या किंमतींनी गेल्या काही महिन्यांत उच्चांक गाठला. एकट्या डिसेंबर महिन्यातच त्यांच्या किंमतीत 20 टक्के वाढ झाली. तथापि, नवीन वर्ष सुरू होताच, किंमती कमी होतील अशी अपेक्षा आहे. महागड्या पाम तेलामुळे इतर खाद्यतेलांच्या किंमतींवर परिणाम झाला. पाम तेल खाद्यतेलंपेक्षा स्वस्त आहे आणि इतरांपेक्षा अधिक वापरले जाते. पाम तेलाच्या जागतिक उत्पादनात 85 टक्के वाटा इंडोनेशिया आणि मलेशियाचा आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षी मेनंतर पाम तेलाच्या किंमती वाढण्यास सुरुवात झाली. महागड्या पाम तेलामुळे सूर्यफूल, मोहरी, शेंगदाणे यासह सर्व खाद्य तेलांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या.
डिसेंबरच्या तुलनेत पाम तेलाच्या दरात सुमारे तीन टक्क्यांनी घट झाली. कमोडिटी एक्सचेंजमधील त्याचे वायदा बाजार डिसेंबरच्या तुलनेत घसरले आहेत. असे मानले जाते, की मलेशिया बायोफ्युएलमध्ये पाम तेल घालण्याची आपली योजना एक वर्षासाठी पुढे ढकलू शकते. त्यामुळे जास्त मागणी वाढणार नाही आणि पाम तेलाच्या किंमती कमी होतील. यावर्षी देशात सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झाले आहे. कुक्कुट उद्योगात सोयाबीन मोठ्या प्रमाणात वापरले जाते. यावर्षी अचानक बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर कमी होत आहेत. देशातील सोयाबीनची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या इंदूरमध्ये गेल्या 14 दिवसांत सोयाबीनच्या किंमती 15 टक्क्यांनी खाली आल्या आहेत. एक जानेवारीला एक क्विंटल सोयाबीन 4700 रुपयांना विकले जात होते, ते आता 4100 रुपयांना विकले जात आहे. त्याचबरोबर मोहरीचे नवीन पीक आल्याने त्याचे दरही कमी होण्याची अपेक्षा आहे. केडिया अ‍ॅडव्हायझरीच्या व्यवस्थापकीय संचालक अजय केडिया यांचे म्हणणे आहे, की जागतिक घडामोडींमधील बदलांमुळे खाद्य तेलांच्या किंमती आठ-दहा टक्क्यांनी कमी होऊ शकतात. अशा परिस्थितीत खाद्य तेलांचे दर खाली येऊ शकतात. नवीन मोहरीचे पीक येऊ लागले आहे. या वर्षी त्याचे चांगले उत्पादन होण्याचा अंदाज आहे. यामुळे किंमती कमी होऊ शकतात. मलेशियामध्ये टाळेबंदीमुळे देशांतर्गत मागणीही कमी झाली आहे. यंदा देशात 104.55 लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ते 15 टक्के जास्त आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर कमी होत आहेत.

Related Articles

Back to top button