कार विक्रीचा आलेख कायम राहणार
मुंबई/दि.९ – हे वर्ष सणासुदीत कारच्या रिटेल विक्रीच्या दृष्टीने गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगले राहिले. १७ ऑक्टोबरपासून ३० नोव्हेंबरदरम्यान ४२ दिवसांच्या अवधीत वाहन वितरकांनी चार लाख ३१ हजार ५९७ कार विकल्या. गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या हंगामाच्या तुलनेत ५१ हजार ६७३ किंवा १३.६० टक्के जास्त विक्री झाली. २०१९ या सणासुदीत तीन लाख ७९ हजार ९२४ कारची विक्री झाली होती.
वाहन वितरकांची संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने(फाडा) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना असतानाही प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ दिसली. नवरात्रीत विक्री मंद होती; मात्र धनत्रयोदशी-दीपावलीदरम्यान मोठ्या संख्येने लोकांनी शोरूममध्ये जाऊन आपल्या आवडीची कार खरेदी केली. ट्रॅक्टरच्या विक्रीत सणासुदीत ४८.७ टक्के एवढी मोठी वाढ दिसली. डीलर्सनी या अवधीत ७३ हजार तीन ट्रॅक्टर विकले. २०१९ च्या सणासुदीत ४९ हजार ९४ ट्रॅक्टर विकले होते.
नोव्हेंबरमध्ये प्रवासी वाहनांची रिटेल विक्री वार्षिक आधारावर ४.१७ टक्क्यांनी वाढून दोन लाख ९१ हजार एक पर्यंत पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी समान महिन्यात ही विक्री दोन लाख ७९ हजार ३६५ होती; मात्र नोव्हेंबरमध्ये दुचाकी वाहनांची विक्री २१.४% घटली. १४ लाख १३ हजार ३७८ दुचाकी विकल्या गेल्या. वर्षभरापूर्वी समान महिन्यात १७ लाख ९८ हजार २०१ दुचाकी विकल्या गेल्या होत्या. फाडानुसार, सणासुदीचा हंगाम संपला असला आणि पेंट-अप डिमांड नगण्य होत असली, तरी यानंतरही डिसेंबर महिन्यात कारच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. कंपन्यांकडून वर्षअखेरीस दिल्या जाणाऱ्या ऑफर्सचा यामध्ये मोठा वाटा असेल. पुरवठा साखळीशी संबंधित अडचणी सोडवल्यास डिसेंबरदरम्यान कारच्या विक्रीत वाढीचा कल सुरू राहू शकतो.
कोरोनामुळे कुटुंबाला येण्या-जाण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करण्यास जास्त प्राधान्य दिले जात आहे. यामुळे प्रवासी वाहनाच्या विक्रीत दोन आकडी वाढ पाहायला मिळाली. नव्या कार, विशेषत: कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मागणी चांगली आहे