मुंबई/दि.२१– केंद्र सरकारला शेतीबाबतची विधेयकं संसदेत संमत करून घेण्यात यश आलं. या विधेयकाला शिवसेनेनं लोकसभेत पाठिंबा दिला, तर राज्यसभेतून त्यांनी वॉकआऊट केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाविरोधात लोकसभेत भाषण केलं, पण राज्यसभेत मतदानाच्यावेळी राष्ट्रवादीनेही शिवसेनेप्रमाणेच वॉकआऊट केलं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं राज्यसभेतून वॉकआऊट केल्यामुळे दोन्ही पक्षांच्या भूमिकांविषयी प्रश्न उपस्थित केले गेले.
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी या मुद्द्यावरुन सूचक विधान केलं आहे. शेतकरी गळचेपी होत आहे आणि मध्यस्तांचा फायदा होतोय, याला काँग्रेसचा विरोधच आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने सभात्याग का केला ते त्यांनाच विचारा. राज्यात आम्ही एकत्र आहोत, केंद्रातही एकत्र असायला हवं होतं. शेतकरी हितासाठी काँग्रेस लढत आहे, तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे हात मजबूत केले पाहिजेत, असं अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान जयंत पाटील यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपला मदत अशी आमची भूमिका नाही. हा प्रश्न पंजाब आणि हरियाणामधल्या शेतकऱ्यांसाठी मोठा आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला तिथे मोठ्या प्रमाणावर विरोध झाला, त्या भागात परिणाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. सत्तारूढ पक्षाला पाठिंबा दिला असं नाही. असं कोणतंही पाऊल पक्षाने टाकलं नाही. आम्ही निषेध व्यक्त केला. बहुमत सत्ताधारी पक्षाकडे होतं. वॉकआऊट हा मार्ग आहे,’ असं जयंत पाटील म्हणाले.