मराठी

शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

आयपीएस अधिकारी लोढा यांचे नेतृत्वात

वरुड/दि.१० – एखाद्या प्रामाणिक अधिकारी रुजू झाला तर काय होवु शकते ? याचा प्रत्यक्ष अनुभव गेल्या दीड महिन्यांपासुन वरुड शहरासह संपुर्ण जिल्ह्याला येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन वरुड शहरात वाढलेले अतिक्रमण काढणार तरी कोण? असा प्रश्न विचारला जात होता परंतु आयपीएस ठाणेदार श्रेणिक लोढा यांचे नेतृत्वात आजपासुन शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली असून अनेकांनी आयपीएस अधिकारी लोढा यांचे अभिनंदन केले आहे.
गेल्या दीड महिन्यांपुर्वी वरुड पोलिस स्टेशनचे ठाणेदार म्हणुन रुजू झालेले श्रेणिक लोढा यांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली. अवैध रेती व्यवसायावर वचक बसविण्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासुन वरुड शहरातील विस्कळीत झालेले वाहतुक व्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न श्रेणिक लोढा यांचेकडून केल्या जात आहे. शहरातील वाहतुक व्यवस्था रुळावर आणायची असेल तर त्यामध्ये शहरात वाढलेले अतिक्रमण त्याकरीता बाधा निर्माण करीत होते. अशा स्थितीत श्रेणिक लोढा यांनी न.प.मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांचेशी संपर्क साधून अतिक्रमण मोहीम राबविण्यात निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही अधिका:यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व शहरातील नगरसेवक यांचे बैठक घेवुन त्यांचा सुध्दा विश्वास संपादन केला आणि सर्व प्रक्रिया पुर्ण करुन आज सकाळपासुन नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे चोख बंदोबस्तामध्ये अतिक्रमण मोहीमेला सुरुवात करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासुन श्रेणिक लोढा व मुख्याधिकारी रविंद्र पाटील हे स्वत: बाजारपेठेमध्ये फिरुन अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याची विनंती अतिक्रमण धारकांना करीत होते, एवढेच नाही तर शहरातील लाऊडस्पिकरव्दारे मुनादी देवुन अतिक्रमण धारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथस नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण मोहीत राबविण्यात येईल, असा इशारा सुध्दा देण्यात आला होता.
पोलिस आणि नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने ईशारा देण्यात आल्यानंतर काही अतिक्रमण धारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले होते परंतु तरीही अनेक अतिक्रमण धारकांनी प्रशासनाच्या इशा:याला प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आज सकाळपासूनच शहरातील महात्मा फुले चौकातून अतिक्रमण मोहीमेला सुरुवात करण्यात आली. सरसकट एकामागुन एक जेसीबीव्दारे अतिक्रमण काढून ते नगरपरिषदेच्या ट्रॅक्टरव्दारे जप्त करण्यात येत होते. जसजसे अतिक्रमण समोर समोर सरकत होते तसतसे अतिक्रमण धारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याची धावपळ दिसून येत होती परंतु एकदाचे अतिक्रमण काढणारी टिम आणि जेसीबी त्या ठिकाणी पोहचला की अतिक्रमण धारकांना बाजुला काढून अतिक्रमण काढून घेतल्या जात होते.
महात्मा फुले चौकातून सुरु झालेली अतिक्रमण मोहीम अप्रोच रोड, पांढूर्णा चौक, जायंटस् चौक आणि पांढूर्णा चौकाची दुसरी बाजू आणि मुलताई चौकापर्यंत पोहचले होते. दुपारी ३.३० ला ही कारवाही थांबविण्यात आली. उद्या सकाळपासुन पुन्हा अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरु करण्यात येईल, अशी माहीती मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांनी दिली.
या अतिक्रमण मोहीमेमध्ये वरुड पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्रेणिक लोढा, तहसिलदार किशोर गावंडे, नायब तहसिलदार प्रतिभा चौधरी, न.प.मुख्याधिकारी रविंद्र पाटील, वरुड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संघरक्षक भगत, हेमंत चौधरी, सारीका बागडे, पोलिस उपनिरिक्षक योगेश हिवसे, राजु चव्हाण यांचेसह नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, अमरावती येथून बोलिवण्यात आलेले दंगा नियंत्रण पथक, शहरातील वाहतुक पोलिस कर्मचारी, नगरपरिषद सफाई कामगार यांचेसह अनेकांचा सहभाग होता.
गेल्या अनेक वर्षानंतर प्रथमच शहरात अतिक्रमण मोहीम राबविल्याबद्दल वरुड पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्रेणिक लोढा, न.प.मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

Related Articles

Back to top button