मराठी

जिल्हाधिकारी यांनी केली सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालायतील कोविड व्यवस्थेची पाहणी

वर्धा, दि 23 –  वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांवर उपचार करणारे जिल्ह्यातील मुख्य रुग्णालये सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी आणि सावंगी येथील आचार्य विनोबा भावे  रुग्णालय  येथील कोविड व्यवस्थेची पाहणी आज जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केली. यावेळी रुग्णालयाची गरज आणि संभाव्य रुग्णसंख्या याबाबत त्यांनी आढावा घेतला. सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी यांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सचिव  डॉ गर्ग, रुग्णालयाचे अधिष्ठाता नितीन गंगणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ कलंत्री, डॉ  सुबोध गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे उपस्थित होते. रुग्णालयात 200 ऑक्सिजन बेड , 24 आय सी यु बेड व्हेंटिलेटरसहित उपलब्ध आहेत.  कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे मध्यंतरी बेड संख्या कमी केली होती. मात्र आता रुग्ण वाढल्यास 300 बेडपर्यंतची व्यवस्था उपलब्ध करून देता येईल असे डॉ कलंत्री यांनी सांगितले. यावेळी डॉ सुबोध गुप्ता यांनी दुसऱ्या लाटेसंदर्भात केलेल्या अभ्यासाचे सादरीकरण केले.  रुग्णालयात उपलब्ध असलेल्या खाटांचा दैनंदिन अहवाल प्रशासनाला द्यावा असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी श्री गुप्ता यांनी जिल्हाधिकारी यांना लॉकडाऊन करण्याची गरज नाही असे सांगून लोकांनी मात्र गर्दी टाळायला हवी, लोकांनी गर्दीत एकत्र जेवण टाळावे तसेच लग्नसमारंभात जेवणाचे कार्यक्रम टाळावे. तसेच संस्थात्मक विलगीकरण  बंधनकारक करू नये यामुळे लोक घाबरून पुन्हा चाचणी करण्याचे टाळतील आणि चाचण्यांची संख्या कमी होईल पर्यायाने कोविड रुग्ण समोर येणार नाहीत असे सांगितले. सावंगी येथील रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांची सद्यस्थिती पाहता यावी यासाठी आय सी यु आणि इतर वार्ड मध्ये लावलेल्या सी सी टी  व्ही कॅमेराचे चित्रीकरण कंट्रोल रूममध्ये दाखवले जाते. या व्यवस्थेची तसेच रुग्णालयातील कोविड व्यवस्थेची  जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. रुग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि अति जोखमीच्या रुग्णांचा पाठपुरावा तसेच मृत्यूचे ऑडिट करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिलेत. रुग्णालयात भविष्यात आवश्यक असलेले मनुष्यबळ आणि औषधे इत्यादींबाबत जिल्हाधिकारी यांनी माहिती घेतली.

यावेळी  सावंगी आयुर्विज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ बोरले, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ महाकाळकर, डॉ श्रीवास्तव उपस्थित होते.

Back to top button