मराठी

जिल्हाधिका-यांनी केली बाभुळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी

यवतमाळ/दि. २३ – ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या कार्यक्रमासाठी बाभुळगावात आलेल्या जिल्हाधिका-यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रत्येक वॉर्डात जाऊन रुग्णांची आस्थेवाईपणे विचारपूस केली. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुषमा खोडवे व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिका-यांनी फवारणीमुळे बाधित झालेल्या रुग्णाची भेट घेऊन विचारपूस केली. किटकनाशक फवारणी करतांना सुरक्षा किट का वापरली नाही, असे विचारून यापुढे काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रसुती पश्चात वॉर्डात जाऊन नवजात शिशुसाठी भेटवस्तू दिली. मुलगा आहे की मुलगी, जन्म झाला तेव्हा वजन किती होते, आदी बाबी त्यांनी विचारल्या. यावेळी जिल्हाधिका-यांनी पुरुष वॉर्ड, महिला वॉर्ड, प्रसुती गृह, शल्य गृह, नेत्र विभाग, एक्स – रे विभाग, समुदपेशन कक्ष, लसीकरण विभाग, बाह्य रुग्ण विभाग पाहून समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या विविध औषधींच्या झाडांची पाहणी केली.
यावेळी तहसीलदार आनंद देऊळगावर, गटविकास अधिकारी रमेश दोडके यांच्यासह रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी आदी उपस्थित होते.

Back to top button