काँग्रेसच्या संकटमोचकाचा अस्त
नवीदिल्ली/ दि.२५ – काँग्रेस नेते अहमद पटेल (वय 71 ) यांचे निधन झाले. पटेल काँग्रेसचे संकटमोचक मानले जात होते. ते सोनिया गांधी यांचे सर्वात जवळचे सल्लागार होते. पटेल यांची गणना काँग्रेसच्या सर्वांत ताकदवान नेत्यांमध्ये होत होती; परंतु ते कधीच सरकारचा भाग नव्हते. इंदिरा गांधी यांच्या काळापासून पटेल यांचे गांधी घराण्याशी जवळचे संबंध होते. 1977 मध्ये ते अवघ्या 28 वर्षांचे होते, तेव्हा इंदिरा गांधी यांनी त्यांना भरुचमधून उमेदवारी दिली होती.
1980 आणि 1984 च्या काळात पटेल यांचा काँग्रेसमधील प्रभाव वाढला. या काळात इंदिरा गांधी यांच्यानंतर जबाबदारी सांभाळण्यासाठी राजीव गांधी यांना तयार केले जात होते. त्यानंतर पटेल राजीव याच्या जवळ आले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव 1984 मध्ये लोकसभेच्या चारशे जागांवर बहुमत घेऊन सत्तेत आले. पटेलही तेव्हा काँग्रेसचे खासदार होते. त्यांना पक्षाचे सहसचिव बनवण्यात आले. काही काळ ते संसदीय सचिव आणि नंतर काँग्रेसचे महासचिव झाले. 1991 मध्ये नरसिंहराव पंतप्रधान झाल्यानंतर अहमद पटेल हे बाजूला सारले गेले. काँग्रेस कार्यकारी समितीच्या सदस्यत्वाव्यतिरिक्त पटेल यांना सर्व पदांवरून काढून टाकण्या आले. त्या वेळी गांधी परिवाराचा प्रभावही कमी झाला होता. त्यामुळे गांधी कुटुंबाच्या निष्ठावंतांनाही अडचणींचा सामना करावा लागला. नरसिंह राव यांनी मंत्रिपदाची ऑफर दिली; परंतु पटेल यांनी फेटाळून लावली. ते गुजरातमधून लोकसभा निवडणूकही हरले आणि त्यांना सरकारी घर रिकामे करण्यासाठी नोटीस मिळू लागली; पण त्यांनी कोणाकडून मदत घेतली नाही.
संयुक्त पुरोगामी आघाडीडी 2004 मध्ये सत्ता आली. तेव्हा पटेल यांनी मंत्रिमंडळात येण्यास नकार दिला आणि पक्षासाठी काम करत राहण्याची इच्छा व्यक्त केली. 2004 ते 2014 या काळात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दोन्ही कार्यकाळात त्यांनी पक्ष आणि सरकार यांच्यात समन्वयाचे अधिक चांगले काम केले. रात्री उशिरापर्यंत काम करणे आणि कोणत्याही वेळी कोणत्याही काँग्रेस कार्यकर्त्याला कोणतेही काम सोपवणे हे पटेल यांच्या कामाचे वैशिष्ठ्य होते. ते एक मोबाईल फोन नेहमीच फ्री ठेवत असत. ज्यावर फक्त दहा जनपथवरून फोन येत असत. ते अतिशय स्ट्रॅटेजिक पद्धतीने काम करायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी वक्तव्यापेक्षा रणनीती घेऊन काम करावे असे ते म्हणायचे.