बंदीवानाची बॅरेकमध्येच दुपट्याने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या्र
वध्र्यातील जिल्हा कारागृहात माजली खळबळ
वर्धा-खूनाच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील रहिवासी गोपीचंद डहाके बंदीवानाने बॅरेकमध्येच दुपट्याने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यानंतर जिल्हा कारागृहात एकच खळबळ उडाली. मिळाल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील रहिवासी गोपीचंद डहाके याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणात उमरखेड न्यायालयाने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मृत गोपीचंद यापूर्वी अमरावती येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे त्याला वर्धा येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी मृत गोपीचंद डहाके याला पेरॉलवर सोडण्यात आले होते. पण, पेरॉलचा कालावधी संपल्यावरही तो कारागृहात परतला नसल्याने अमरावती आणि वर्धा पोलीस त्याचा शोध घेत होती. गोपीचंदला उमरखेड मधून यवतमाळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याची संपूर्ण चौकशी आणि तपासणी केल्यावर त्याला वर्धा येथील जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले होते. काही दिवसांपासून बंदीवान गोपीचंद हा नैराश्यात होता. त्याने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुपट्याने बॅरेकमध्ये असलेल्या खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणाची शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेश पारधी करत आहेत.