अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर
न्यूयार्क दि ४ – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कोरोना प्रभावित भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत आहे, असे म्हटले आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती केली आहे. उत्पादन वाढीमुळे चालू आर्थिक वर्षात जीडीपी 7.5 टक्क्यांनी घसरू शकेल. ग्राहकांच्या चांगल्या मागणीमुळे जीडीपीत सुधारणा होऊ शकते.
कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर तीव्र परिणाम झाला वॉशिंग्टनमधील जागतिक नाणेनिधीची मुख्य प्रवक्ते गॅरी राईस म्हणाले, की भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला होता; परंतु आता हळूहळू अर्थव्यवस्था सावरत आहेत. अर्थव्यवस्थेच्या पुनर्प्राप्तीसाठी भारत सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. सरकारने वाढीस आधार देण्यासाठी विद्यमान कार्यक्रम वेगाने राबवावेत. याव्यतिरिक्त या कार्यक्रमांची व्याप्ती वाढविणेदेखील आवश्यक आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जागतिक नाणे निधीशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले, की भारतीय अर्थव्यवस्था व्ही-आकारात सुधारताना दिसते आहे. जीडीपीची पहिल्या तिमाहीत वाढ उणे २३.९ टक्के होती. त्यानंतरच्या तिमाहीत ती उणे साडेसात टक्के झाली. नोव्हेंबर महिन्यासाठी अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या मासिक आर्थिक आढाव्यात म्हटले आहे, की आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत व्ही-शेप रिकव्हरीचा अर्थ असा आहे की भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि वेगाने सुधारू शकते. या अहवालानुसार विकसित देशांमध्ये महागाई कमी झाली आहे, तर उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये महागाई वाढली आहे. याचा अर्थ असा होतो, की कमकुवत अर्थव्यवस्थांमध्ये पुरवठा बाजूच्या व्यत्ययाचा जास्त परिणाम होतो. शेअर बाजाराचा कल सूचित करतो, की गुंतवणूकदारांमधील आशेची पातळी खूपच जास्त आहे. नोव्हेंबरमध्ये डॉलरच्या दुर्बलतेमुळे उर्वरित जगातील विकासाच्या संधींना बळकटी मिळाली आहे. डिसेंबर तिमाहीत देशातील आर्थिक अनिश्चितता अपेक्षित नाही. तिस-या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) संबंधित सरकारी अहवालात म्हटले आहे, की नोव्हेंबरमध्ये काही निर्देशकांची घट झाली असली, तरी जगभरातील आर्थिक अनिश्चितता भारतात दिसून येणार नाही. रब्बी पिकांखालील क्षेत्र वाढले असून जलाशयांमध्ये पाणी भरले आहे. या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी हे चांगले आहे.