मराठी

शेतक-याचा मुलगा जपानचा पंतप्रधान

योशिहिदे सुगा जपानचे नवे पंतप्रधान

टोकियो/दि.१४  – प्रकृतीच्या कारणास्तव जपानचे पंतप्रधान शिंजो एबे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्या जागी योशिहिदे सुगा हे जपानचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पक्षाने योशिहिदे यांना आपले नेता म्हणून निवडले आहे. त्यांना नेतेपदाच्या निवडणुकीत पक्षाचे खासदार आणि स्थानिक प्रतिनिधींची 534 पैकी 377 मते मिळाली. पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांचे पंतप्रधान बनणे ही केवळ औपचारिकता आहे. शिंजो एबे यांच्या कार्यकाळात 71 वर्षीय सुगा यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केलेले आहे.
लिबरल डेमोक्रेटिक पक्षाचे सदस्य असलेले योशिहिदे सुगा हे कोणत्याही गटाशी संबंधित नाहीत. शिंजो एबे यांच्या धोरणांना पुढे नेणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. यात अमेरिकेसोबत सुरक्षा संबंध, कोरोना महामारीवर मात आणि अर्थव्यवस्थेला मजूबत करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. सुगा हे जपानमध्ये सर्वाधिक काळ मुख्य कॅबिनेट सचिव पदावर राहिलेले आहेत. ते एबे यांचे धोरण समन्वयक आणि सल्लागारदेखील होते. सुगा यांना एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ओळखले जाते. त्यांचे वडील स्ट्रॉबेरीची शेती करत असे. सुगा यांनी टोकियोच्या होसेई यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले व त्यानंतर निवडणूक प्रचार अभियानात काम सुरू केले. एका खासदाराचे सचिव म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे.

Related Articles

Back to top button