रशियात डाॅक्टर, शिक्षकांना कोरोना लसीचा पहिला डोस
माॅस्कोः रशियाने कोरोना विषाणूच्या विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या महिन्यात दहा तारखेपर्यंत लसीची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राधान्यक्रम ठरवताना डॉक्टर आणि शिक्षकांना या लसीचा पहिला डोस देण्यात येईल, अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली.
‘गेमली इन्स्टिट्यूट ऑफ अॅलपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी’ने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून नोंदणीसाठी कागदपत्रे सादर केली आहेत, असे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्कोव यांनी सांगितले. नियमानुसार या लसीच्या चाचण्या झाल्या असून कुठेही संशोधनाचा कालावधी कमी केलेला नाही, असे रशियन संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. ‘गेमली इन्स्टिट्यूट ऑफ अॅखपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी’ने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरू केल्या होत्या.
मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे, हाच या चाचणीमागचा हेतू होता आणि तो साध्य झाला आहे असे अलेक्झँडर लुकाशेव यांनी पहिल्या फेजनंतर सांगितले होते. कोरोना विरोधात वापरण्यासाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे लुकाशेव यांनी सांगितले.