नवी दिल्ली/दि.२ – अर्थसंकल्पातील घोषणांचा कार्पोरेट क्षेत्र तसेच भांडवली बाजाराला खूप आनंद झाला आहे; परंतु लोक संतप्त दिसत आहेत. एका हिंदी दैनिकाने घेतलेल्या सर्वेक्षणात 70 टक्के लोकांनी अर्थसंकल्पातील घोषणांमुळे महागाई वाढणार असल्याचे सांगितले. 58 टक्के लोक अर्थसंकल्प चांगला नाही, असे म्हणतात. यात मध्य प्रदेश, गुजरात आणि बिहारमधील लोकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही तीनही राज्ये भाजपशासित आहेत.
सोमवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे बजेट भाषण संपल्यानंतर लगेचच देशभरात ऑनलाईन आणि ऑफलाइन सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये लोकांना दोन प्रश्न विचारले गेले. प्रथम- आपण या अर्थसंकल्पावर समाधानी आहात ? दुसरा प्रश्न या अर्थसंकल्पामुळे महागाईचा फटका बसणार आहे का, असा होता. ऑनलाइन सर्व्हेसाठी गुगल फॉर्म व सोशल मीडियाची मदत घेण्यात आली. त्याच वेळी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, हरियाणा, दिल्ली, गुजरात, पंजाब, चंदीगड, झारखंड, महाराष्ट्रआणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑफलाइन सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सुमारे 12 हजार लोकांच्या प्रतिसादाचा समावेश आहे.
सरकारच्या या अर्थसंकल्पातून आपल्याला काहीही मिळालेनाही, याबद्दल सर्व्हेतील बर्याच लोकांनी नाराजी व्यक्त केली. नवीन अर्थसंकल्पात खासगीकरणाला प्रोत्साहन देण्यात आलेआहे. कराबाबत काही नवीन नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही सतत वाढत आहेत. वाढत्या महागाईचा त्यांच्या जगण्यावर परिणाम होईल. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढतील, असा अंदाज आहे.