मुंबई/दि.२८– राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनास सादर करावीत. त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबईतील जिम चालकांचे प्रतिनिधी महेश गायकवाड, निखिल राजपुरिया, करन तलरेजा, हेमंत दुधवडकर, गुरुजितसिंग गांधी, योगिनी पाटील, साईनाथ दुर्गे, रमेश गजरीया, मनोज पाटील उपस्थित होते.
मुंबईतील जिम चालकांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, जिम सुरु करताना कोरोनाचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे. यासाठी सर्व जिमचालकांनी एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे ठरविणे आवश्यक आहेत. ही तत्वे राज्यातील जिम चालकांनी एकत्रितपणे ठरवून शासनास सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.
दरम्यान, जीम, मंदिरे बंद ठेवण्यात आल्याने विरोधकांकडून राज्य सरकारविरोधात आरोप करण्यात येत आहेत. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जीम सुरु करा, पुढचे पुढे पाहू, असा इशारा दिला आहे. जीम मालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. त्यावेळी मनसेनेने राज्य सरकारला इशारा दिला होता.