अमरावती/ दि. २९ – गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यापीठीय कर्मचाऱ्यांप्रती नकारात्मक दृष्टीने बघितल्या जात असून आजही ही परंपरा कायम आहे. अन्य कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे लाभ मिळत असताना विद्यापीठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्यायीक अधिकारांपासून दूर ठेवण्याचे काम आजवर झालेले असून शासनाची कर्मचाऱ्यांप्रती असलेली सद्भावना हरवली असल्याचा घणाघाती आरोप संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी आज केला. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला सर्वत्र पाठिंबा वाढत असून त्यामुळे विद्यापीठीय कर्मचाऱ्यांचे मनोबल आणखी उंचावले आहे. आज विद्यापीठीय कर्मचाऱ्यांची एकत्रित बैठक विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोर पार पडली. यावेळी कर्मचाऱ्यांशी बोलताना अजय देशमुख यांनी संघटनेची संपूर्ण भुमिका मांडत सदर आंदोलनावरून कर्मचाऱ्यांची संवाद साधला. यावेळी कर्मचाऱ्यांनी आता कुठल्याही स्थितीत न्याय मिळविल्याशिवाय हे आंदोलन मागे घ्यायचे नाही असाच निर्धार केला आहे. शासनाने विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तसेच आश्वासीत प्रगती योजनेपासून दूर ठेऊन त्यांच्यावर प्रचंड अन्याय केला असून या अन्यायाचा बिमोड केल्याशिवाय आता हार मानायची नाहीच असाच निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. १ ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा ३० सप्टेंबरपर्यंतच असून १ ऑक्टोबरपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे. त्यामुळे आता विद्यापीठीय कामकाम आणि परीक्षा अशा विविध विषयांवरून अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबरपासून विद्यापीठांच्या परीक्षा सुरू होणे अपेक्षित होत्या. मात्र आता परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक संपूर्णपणे बिघडणार आहे. प्राध्यापकांसहित विद्यार्थी देखील कर्मचाऱ्यांच्या पाठिशी विद्यापीठीय कर्मचाऱी संघटनेच्या पाठिशी विविध प्राध्यापक तसेच विद्यार्थी संघटना देखील पाठिशी उभ्या राहिल्या आहेत. आज संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचाचे अध्यक्ष प्रा.प्रदीप खेडकर यांनी अजय देशमुख यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दिला आहे. शासनाने आता कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा शैक्षणिक व्यवस्थेत अडचणी निर्माण होतील अशी प्रतिक्रिया खेडकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देखील कर्मचाऱ्यांच्या मागण्या संयुक्तिक ठरवत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठविले आहे.