पाटणा/दि.१५ – ‘पुरोगामी असलेले महाराष्ट्र सरकार हे आता प्रतिगामी व्हायला लागले आहे. कोरोनाच्या काळात टाळेबंदी उठवताना केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या, त्यादेखील मान्य करायला महाराष्ट्र सरकार तयार नाही. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत बिकट होत चालली आहे. महाराष्ट्र सरकारने बेभरवशावर न राहता निर्णय घेणारे राज्य म्हणून पुन्हा लौकिक मिळवावा’, असे आवाहन वंचित आघाडीचे नेते एड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
ते म्हणाले, की टाळेबंदीनंतर इतर राज्यांची आर्थिक परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा चांगली आहे. इतर राज्यांनी टाळेबंदी उठवताना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेतला होता; मात्र महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना मान्य करायला तयार नाही. महाराष्ट्र सरकारने अद्यापही टाळेबंदी पूर्णतः मागे घेतली नाही. राज्यातील मंदिरे बंद असल्याने स्थानिक लोकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बेभरवशावर न राहता पुरोगामी निर्णय घेणारे राज्य उभे करावे.
महाराष्ट्र सरकार हे अगोदर पुरोगामी सरकार होते; परंतु आता ते हळूहळू प्रतिगामी व्हायला लागले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकार मान्य करायला का तयार नाही? इतर राज्यांनी मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला; मात्र महाराष्ट्र सरकारने अजूनही मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला नाही. मंदिरे बंद असल्याने स्थानिक लोकांचे नुकसान होत आहे. शासनाने लवकरात लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे. असे ते म्हणाले.
राज्याची आर्थिक स्थिती कशी सुधारेल हे सरकारने पाहिले पाहिजे; मात्र सरकार या दिशेने कोणतीही पावले टाकताना दिसत नाही. त्यामुळे बेभरवशावर न राहता पुरोगामित्व निर्णय घेणारे राज्य उभे करावे, असे आवाहन एड. आंबेडकर यांनी केले.