पुणे/प्रतिनिधि/दी.६ – अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नाहीत. सरकारने कोविड कोविड करणं थांबवावे. फक्त मोबाईलच्या कॉलरट्यून वर देशात अनलॉक आहे म्हणून सांगू नका, प्रत्यक्षात ते लागू करावे. कोरोना काळात पंतप्रधान कार्यालयापासून ते जिल्हा पातळीवर चालढकल करणे सुरू आहे. सर्वप्रथम शासनाने कोरोनातून बाहेर पडावे आणि सर्व व्यवहार सुरू करावे, अन्यथा 10 तारखेनंतर वंचित बहुजन आघाडी राज्यसरकार विरोधात रस्त्यावर उतरेल, अशा खरमरीत शब्दांत बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे. प्रकाश आंबेडकर आज पुण्यात आले होते . त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, राज्याचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे..शासन स्वत:हून निर्णय का घेत नाही..सर्व निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयावर सोडले आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने एक वेळापत्रक ठरवून द्यावं की या दिवशी सर्व व्यवहार सुरू होतील. कोविड चा परिणाम आहे की नाही याची चर्चा आता जनतेने करावी..इतर देशात जो लॉकडाऊन सुरू आहे त्याची कॉपी आपण करतो की काय अशी शंका येतेय. 2019 च्या वर्षभरात जेवढी माणसं दगावली तेवढीच 2020 च्या कोरोना काळातल्या तीन महिन्यात माणसे दगावली आहेत. त्यामुळे शासनाने कोरोनातून बाहेर पडावे आणि सर्व व्यवहार सुरू करावेत.