सरकार प्राप्तिकर दात्यांवर विश्वास ठेवणार
मोदी यांची ग्वाही; करदात्याच्या सनदेतून सन्मान राखला जाणार
नवी दिल्ली/दि.१३ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करदात्यांचा विश्वास वाढविण्यासाठी अनेक घोषणा केल्या. मोदी म्हणाले, की करदात्यांची सनद ही देशाच्या विकासाच्या प्रवासातील एक मोठी पायरी आहे. आता करदात्याला न्याय्य, सभ्य आणि तर्कशुद्ध वागण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. म्हणजेच आता प्राप्तिकर विभागास संवेदनशीलतेने करदात्याच्या सन्मानाची काळजी घ्यावी लागेल. करदात्यावर विश्वास ठेवावा लागेल, विभाग कोणत्याही आधाराशिवाय कोणाकडेरही संशयाशिवाय ते पाहू शकणार नाही, असा दिलासा त्यांनी दिला. गेल्या सात वर्षांपासून प्राप्तिकरदात्यांना विश्वासात घेण्याची, त्यांचा सन्मान राखण्याची भाषा बोलली जात होती. आज करतात्यांसाठी सनद जाहीर करून त्यांनी एक पाऊल पुढे टाकले. मोदी यांनी करदात्यांना कर भरण्यास प्रोत्साहित केले. ते म्हणाले, की गेल्या सहा-सात वर्षांत प्राप्तिकर विवरणपत्र भरणा-यांची संख्या सुमारे २५ लाखांनी वाढली आहे; पण हेही खरे आहे, की १३४ कोटींच्या देशात अजूनही हे प्रमाण खूपच कमी आहे. ते म्हणाले, कर भरण्यास सक्षम असलेल्यांनी आत्मप्रेरणा घेऊन पुढे यावे. विश्वास, हक्क, कर्तव्ये, व्यासपीठाचा आदर करा. ते करून, एका नव्या भारत, स्वावलंबी भारताचा संकल्प सिद्ध करा.
आपली कर प्रणाली अखंडित, वेदनारहित, चेहराविरहित करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, की कर प्रशासनाने प्रत्येक करदात्यासोबत गोंधळ घालण्याऐवजी समस्या सोडविण्याचे काम केले पाहिजे. तंत्रज्ञानापासून नियमांपर्यंतची सर्व कामे वेदनारहित व्हावीत. भारताच्या करप्रणालीत मूलभूत आणि संरचनात्मक सुधारणांची आवश्यकता होती. कारण आपली आजची व्यवस्था गुलामीच्या काळात तयार केली गेली होती आणि नंतर हळूहळू विकसित झाली. स्वातंत्र्यानंतर बरेच बदल केले गेले; परंतु मुख्यत: व्यवस्थेचे वैशिष्ट्य तसेच राहिले. जिथे गुंतागुंत आहे, तेथे अनुपालन करणे कठीण आहे. कमीतकमी एक कायदा असावा, जर कायदा अगदी स्पष्ट असेल, तर देशाचा करदातादेखील आनंदी राहील.
सुधारणेचा अर्थ नीतीआधारित असला पाहिजे. सुधारणा तुकड्या तुकड्यात करून उपयोग नसतो. एक सुधारणा दुस-या सुधारणेचा आधार असावी, असे सुचवून मोदी म्हणाले, नवीन प्रणाली, नवीन सुविधा, किमान सरकार, यी त्रिसूत्रीवर आमचा कारभार असेल. देशवासीयांच्या जीवनातून सरकारचा हस्तक्षेप कमी करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. २५ सप्टेंबर म्हणजेच दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी देशभरातील नागरिकांना फेसलेस अपीलची सुविधा उपलब्ध असेल.
प्राप्तिकर परताव्याची प्रीफिलींग सुरू
करदात्यांची सोय लक्षात घेता प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर परताव्याची प्रीफिqलग सुरू केली आहे. यामुळे करदात्यांना प्राप्तिकर विवरण भरणे सुलभ झाले आहे. कर भरणा-यांना वार्षिक परतावा भरण्यासाठी वैधानिक मुदत वाढविण्यासह कॅशफ्लो वाढविण्यासाठी जलद परतावा देण्यात आला आहे.