मराठी

काँग्रेसचे तळागाळातील संघटन कमकुवत

पी. चिदंबरम् यांचे मत

नवीदिल्ली/दि.१८ –  बिहार निवडणूक आणि अन्य राज्यांतील पोटनिवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या कामगिरीवर पक्षातीलच वरिष्ठ नेते आता प्रश्न उपस्थित करत आहेत. याबाबत पी. चिदंबरम यांनी, काँग्रेसचे तळागाळातील संघटन कमकुवत पडले, याची कबुली दिली. प्रत्येक स्तरावर आत्मपरीक्षणाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
एका मुलाखतीत चिदंबरम् म्हणाले, की राहुल गांधी यांनी गांधी परिवाराशी संबंध नसलेल्या व्यक्तीस अध्यक्षपदासाठी प्राथमिकता देणार असल्याचे जाहीर केले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समिती पक्षाचा अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करेल हे आता सांगता येणार नाही. नुकत्याच पार पडलेल्या बिहारमधील निवडणुकांच्या निकालासंदर्भात काँग्रेसच्या सद्य:स्थितीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना चिदंबरम यांनी उत्तरे दिली. बिहार निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसला कोणता संदेश दिला, या पश्नावर ते म्हणाले, की संदेश नक्कीच मिळाला, गैर-भाजप आघाडी ही भाजपच्या बरोबरीने मते मिळवू शकते; पण भाजप आघाडीच्या तुलनेत जागांच्या बाबतीत आम्ही कमी पडतो. आम्हाला आणखी तळागाळापर्यंत पोहोचून आघाडी मजबूत करावी लागेल. जमिनीशी पकड चांगली असेल, तर अनेक लहान पक्षसुद्धा यश मिळवू शकतात, हे भाकपा-माले आणि एआयएमआयएमने दाखवून दिले आहे.
काँग्रेसने बिहारमध्ये केवळ 45 उमेदवारच रिंगणात उतरवायला हवे होते. आता केरळ, तामीळनाडू, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करताना बिहारचा धडा समोर ठेवाला लागेल, असे सांगून चिदंबरम् म्हणाले, की मी गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील पोटनिवडणुकीतील निकालांनी अधिक चिंतीत आहे. हे निकाल सांगतात, की जनसामान्यांवरील पक्षाची पकड सैल किंवा कमकुवत झाली आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल-काँग्रेससाठी जमीन उपजाऊ होती. आम्ही विजयाच्या अगदी जवळ असताना का हरलो, याची व्यापक समीक्षा झाली पाहिजे. काँग्रेसने राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये विजय मिळवला, याला फार काळ लोटलेला नाही. मला तपशील माहीत नाही. जगभर अशी प्रथा आहे, की जय आणि पराजय यातील अंतर कमी असल्यास दुसर्‍यांदा मतमोजणी होते. निवडणूक आयोग एक हजार किंवा दोन हजारांपेक्षा कमी मतांचे अंतर असल्यास दुबार मतमोजणी केल्यास बिघडले कुठे?
अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीत अध्यक्ष कुणाला निवडले जाईल, हे मी सांगू शकत नाही. कुणीही निवडणूक लढवू शकतो. राहुल गांधी यांनी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला प्राधान्य देण्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसचा अध्यक्ष निवडण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन बोलावण्याची इच्छाही व्यक्त केली, असे सांगून ते म्हणाले, की आत्मचिंतन पंचायतीपासून ते ब्लॉक स्तरापर्यंत झाले पाहिजे. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या 24 ऑगस्टच्या बैठकीत आत्मचिंतनाची बाब स्वीकारली होती. जिथपर्यंत पत्राचा विषय होता, त्याविषयी पक्षात मंथन सुरू आहे. कधीकधी हा विषय सार्वजनिक होतो. यात विशेष असे काही नाही.

भाजपशी लढण्यासाठी कसून तयारी हवी

राष्ट्रीय स्तरावर भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस व्यतिरिक्त अन्य कोणता पक्ष नाही. बाकी सर्व पक्ष प्रादेशिक आहेत. काँग्रेसला माहीत आहे की, भाजपशी दोन हात करण्यासाठी कसून तयारी करावी लागेल. काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाही पद्धतीने राजनीती अधिक मजबूत होईल. तशी अंतर्गत व्यवस्था भाजपात आहे काय, असा सवाल पी. चिदंबरम् यांनी केला.

Related Articles

Back to top button