पालकमंत्र्यांनी आमल्याला भेट देऊन केले दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांचे सांत्वन
पूल वाहून गेल्याच्या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश -पालकमंत्री एड.यशोमती ठाकूर
-
मृतकांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार
अमरावती, दि. 17: आमला येथील पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेत निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून देऊ, त्याचप्रमाणे, या कुटुंबातील लहान मुलांच्या शिक्षणासाठीही मदत करण्यात येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड.यशोमती ठाकूर यांनी आज आमला येथे सांगितले.
पेढी नदीवरील पूल वाहून गेल्याने आलेल्या पुरात तीन व्यक्ती वाहून मृत्यूमुखी पडल्या. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज आमला येथील जाऊन या व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. घरातील व्यक्ती जाणे ही कधीही भरून न येणारी हानी असते. या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल. कुठलीही अडचण आल्यास आपल्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. या सर्वांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. पालकमंत्र्यांनी या व्यक्तींच्या कुटुंबांतील महिला, मुले, ज्येष्ठ व्यक्ती आदी सर्वांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले व धीर दिला.
शेतक-यांना नुकसानभरपाई
सालोरा (आमला) येथील पुल तुटल्यामुळे पुराचे पाणी शेतात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करुन नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असे आदेश श्रीमती ठाकूर यांनी दिले. पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबीयांना तत्काळ सानुग्रह मदत निधीसह सर्व प्रकारची मदत तातडीने करावी, असेही त्यांनी सांगितले.
दोषींवर कारवाईचे आदेश
आमला येथील पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री एड. ठाकूर यांनी दिले. सालोरा (आमला) येथील पुलाचे काम विहीत मुदतीत पूर्ण झालेले नाही. त्यामुळेच जिवितहानी झाल्याची तक्रार आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी. कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, तसेच इतर दोषींवरही कारवाई व्हावी, असे निर्देश देतानाच, कुठल्याही कामात कुणाकडूनही हलगर्जीपणा किंवा कुचराई खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.
प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करावे. नागरिकांच्या जीवाशी खेळ झालेला खपवून घेणार नाही. कामे मुदतीतच पूर्ण झाली पाहिजेत. पावसाळा लक्षात घेता जिल्ह्यात सर्व ठिकाणी जिल्ह्यातील आवश्यक रस्ते, पूल व इमारतींची कामे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिवीतहानी, वित्तहानी तसेच अपघात टाळण्यासाठी ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.