अमेरिकेच्या निवडणुकीचा शेअर बाजारावर परिणाम
मुंबई/दि.२९ – अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी तीन नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी त्याचा भारतीय गुंतवणूक आणि शेअर बाजारावर परिणाम होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसह फार्मा कंपन्यांच्या समभागांवर लक्ष ठेवून आहेत.
कोरोना साथीच्या काशात आैषधी कंपन्यांसह तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर कंपन्या चांगली कामगिरी करत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाचा परिणाम कर आकारणी, व्यापार आणि व्हिसाच्या धोरणावर होईल. त्याचे पडसाद भारतीय कंपन्यांवर पडतील. स्वित्झर्लंडची गुंतवणूक बँकिंग कंपनी यूबीएस ग्रुप म्हणते, की या निवडणुकीचे जे काही परिणाम उद्भवू शकतील, त्याचा त्याचा सर्वांत मोठा फायदा आशिया पॅसिफिक प्रदेशात होणार आहे. बिडेन निवडणुकीत विजयी झाले, किंवा विडेन जिंकले आणि तेथील काँग्रेसचे विभाजन झाले किंवा ट्रम्प विजयी झाले अशा तीनही शक्यतांत केवळ भारताचा फायदा होईल. गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या यूबीएसच्या अभ्यासानुसार असे निष्कर्ष काढण्यासाठी व्यापार आणि परराष्ट्र धोरण, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह धोरण आणि पायाभूत सुविधांवर होणा-या खर्चाचे मूल्यांकन केले गेले आहे.
ब्लूमबर्गने म्हटले आहे, की आपल्या आकडेवारीच्या आधारे गेल्या पाच अमेरिकन अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात दर पाच सत्रांत सरासरी २.१ टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिकेची निवडणूक पाहता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस लिमिटेड (Infosys Limited), एचसीएल टेक्नोलॉजीज (HCL Technologies), विप्रो आणि टेक महिंद्रा यांसारख्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर आहे. माहिती तंत्रज्ञान निर्देशांकात या आर्थिक वर्षात 36 टक्के वाढ झाली आहे आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी फार्मा क्षेत्राला मागे टाकले आहे. भारतीय शेअर बाजारामध्ये फार्मा कंपन्यांनी या आर्थिक वर्षात सर्वाधिक चांगली कामगिरी केली. एस अँन्ड पी बीएसईच्या हेल्थकेअर इंडेक्समध्ये यावर्षी सर्व 19 क्षेत्रांना मागे टाकत 45 टक्के इतकी अभूतपूर्व वाढ झाली आहे. फार्मा क्षेत्रात ज्या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या नजरेत आहेत, त्यांच्यात सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, सिप्ला लिमिटेड, ल्युपिन फार्मा, ल्युपिन फार्मा, अरबिंदो यांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली, तर भारताच्या वाहन कंपन्यांनाही फायदा होईल. सिटीग्रुपने दिलेल्या अहवालात म्हटले आहे, की अमेरिकेच्या चीनबरोबरच्या व्यापारयुद्धाचा फायदा भारतीय वाहन निर्यातदारांना होईल. चीनमबरोबरच्या तणावामुळे अमेरिकेने औषधासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत अमेरिका औषधांसाठी भारतावर अवलंबून भारतीय फार्मा कंपन्यांना अमेरिकेत पाय ठेवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
कोण जिंकले, तर काय होणार?
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन लोकांना नोकरीत प्राधान्य दिले आहे. त्यासाठी त्यांनी व्हिसा नियम कडक केले. त्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांना अडचण झाली. बिडेन व्हिसा नियम शिथिल करण्याच्या बाजूने आहेत. याशिवाय विझेन करातही थोडासा दिलासा देऊ शकतात. भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांना याचा फायदा होऊ शकेल; परंतु डेमोक्रॅटिक पक्षाने जाहीर केलेल्या प्रोत्साहन पॅकेजच्या घोषणेमुळे डॉलर कमकुवत होऊ शकेल आणि रुपया मजबूत होईल. त्याचा फटका आयटी कंपन्यांना बसेल.