सुनेच्या शोधासाठी सासूने कापली स्वतःची जीभ
अंधश्रद्धेपोटी महिलेनं आपली जीभ कापून देवाला अर्पण केली
रांची/दि. १८ – अंधश्रद्धेपोटी एका महिलेनं चक्क आपली जीभ कापून ती देवाला अर्पण केली. हरवलेली सून परत सापडावी, ती परत यावी यासाठी महिलेने हे कृत्य केले. झारखंडच्या खरसावन जिल्ह्यातील सरायकेलाच्या एनआयटी कॅम्पसमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पीडित महिलेला स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र नंतर अधिक उपचारांसाठी तिला जमशेदपूरच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पीडित महिला घरकाम करते. तिचे नाव लक्ष्मी निराला आहे. सध्या पीडित महिला लक्ष्मी निरालाची तब्येत तशी स्थिर आहे आणि ती उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहे; मात्र आता महिलेला बोलता येत नाही. महिलेने भगवान शंकरासमोर आपली जीभ छाटली. १४ ऑगस्टला संध्याकाळी निराला यांची सून ज्योती तिच्या मुलासह बेपत्ता झाली. ज्योती सापडत नसल्याने निरालाने देवाकडे ती सापडावी म्हणून प्रार्थना सुरू केली आणि ब्लेडच्या साह्याने आपली जीभ कापून ती महादेवाला अर्पण केली.
आपली सून ज्योती सुखरूपपणे घरी परत यावी, म्हणून ती, देवासमोर प्रार्थना करत होती. पीडित महिलेचा पती नंदुलाल निराला यांनी सांगितले, की महिलेने असे भयंकर पाऊल उचलले, कारण तिला तसा कुणीतरी सल्ला दिला होता. नंदु यांनी पुढे सांगितले, की कुणी तिला सांगितले, की जर तिने जीभ देवाला अर्पण केली तर ज्योती नक्की परत येईल. शुक्रवारपासूनच त्यांनी ज्योतीचा शोध घेणे सुरू केले; पण त्यांना तिला शोधण्यात यश मिळाले नाही. त्यानंतर नंदु आणि त्यांच्या मुलाने शनिवारी पोलिस ठाण्यात सून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
अंधक्षद्धेतून बळी
अंधश्रद्धेतून घडलेली ही काही पहिलीच घटना नाही. अशा प्रकारच्या अनेक घटना अंधश्रद्धेतून घडल्या आहेत. २०१७ मध्ये अंधश्रद्धेतून एका सासू-सुनेने चार वर्षांच्या मुलाचा बळी दिला होता. याप्रकरणी दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या घरात मुलाचा जन्म व्हावा, म्हणून ४० वर्षीय सून आणि ६० वर्षीय सासूने मिळून चार वर्षीय मुलाची हत्या केली. पाटणा इथल्या गोपाळगंज येथे २०१७ साली ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन महिलांनी कोयत्याने देवकुमार नावाच्या चार वर्षीय चिमुरड्याची हत्या केली. ४० वर्षीय संकेषा हिला एकही मूल नव्हते आणि तिला मुलगाच हवा असल्याने तिने हे भयंकर कृत्य केले होते.