मराठी

स्वच्छतेसाठी पैशापेक्षा मानसिकतेची गरज

स्वच्छता अभियानातील ग्रामपंचायत, कार्यकर्ता व कर्मचाऱ्यांचा सत्कार

वर्धा दि 7- स्वच्छता हा एखाद्याच्या जीवनाच्या सवयीचा भाग होत नाही तोपर्यंत गावात स्वच्छता निर्माण होणार नाही. स्वच्छतेसाठी पैश्यापेक्षा मानसिकतेची गरज जास्त आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले.
महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त  स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत नगरपरिषद, नगरपंचायत आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि बक्षीस वितरण  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री भीमनवार  बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे,नगराध्यक्ष अतुल तराळे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ विजय इंगोले,  उपजिल्हाधिकारी वर्षा लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, विपुल जाधव, कोटंबाच्या सरपंच रेणुका कोटंबकर, कोळोनाचे  सरपंच प्रमोद बिरे, नारायणपूरचे सरपंच युवराज तांदूळकर उपस्थित होते.
एखाद्या देशाचे प्रगतीचे मापदंड मोजताना त्या देशात महिलांना मिळणारा सन्मान, शिक्षण, श्रमाला मिळणारी प्रतिष्ठा, आरोग्य, स्वच्छता आणि तळागळातील लोकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा अशा सामाजिक सुधारणाचे मापदंड मोजले जातात.  महात्मा गांधीनी यासर्व सुधारणा सांगितल्या होत्या. भौतिक सुविधा उभ्या करुन  एखाद्या देशाची प्रगती होत नाही. त्यामुळेच देशाला विकासाची झेप घेत असताना सामाजिक सुधारणा  करणे सुद्धा
आवश्यक ठरणार आहे.  यापुढे स्वच्छता म्हणजे वर्धा आणि सेवाग्राम असे समीकरण जुळले पाहिजे. वर्धा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच हे करून दाखवतील असा विश्वास श्री भीमनवार  यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलताना सरिता गाखरे यांनी वैयक्तिक वस्तू प्रमाणेच सार्वजनिक वास्तूंचे जतन करणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील दाखले देत स्वच्छता, आरोग्य आणि  गावकऱयांची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. स्वच्छतेचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी आहे. त्यामुळे गाव स्वच्छ राहिले तर गावातील लोकांचा आरोग्यावर होणारा खर्च नक्कीच कमी होईल असेही त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या गावात केलेल्या सुधारणामध्ये लोकांचा सहभाग कसा मिळवला याबाबत मार्गदर्शन केले. तसेच नगराध्यक्ष अतुल तराळे, रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर, कोळोनाचे सरपंच प्रमोद बिरे, कुटुंबाच्या सरपंच रेणुका कोटंबकर, नारायणपूरचे सरपंच युवराज तांदूळकर यांनी त्यांच्या गावात केलेल्या सुधारणा आणि स्वच्छता याबाबत त्यांचे मनोगत व्यक्त केले.  यावेळी रसुलाबाद ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियानावर बनवलेला लघुपट दाखविण्यात आला.
स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आर्वी तालुक्यातील  ग्रामपंचायत रसुलाबाद, आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायत आनंदवाडी आणि वर्धा तालुक्यातील महाकाळ या ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्वच्छता अभियानाची जनजागृती व्हावी म्हणून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांक वैष्णव शेंडे, द्वितीय क्रमांक अनुश्री कांबळे आणि  तृतीय  क्रमांक नेहा सुपारे यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्याबरोबर स्वच्छता कार्यकर्ता आणि कर्मचाऱ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. दरम्यान सकाळी सर्व ग्रामपंचायत व नगर परिषद क्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे  उप मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे यांनी केले संचालन प्राध्यापक डॉक्टर प्रियंका  जाधव तर आभार मुख्याधिकारी विपीन पालीवाल यांनी मानले.

Related Articles

Back to top button