मराठी

शहरातही खाटांची संख्या वाढवावी

तिवसा, मोर्शी, दर्यापूर येथील उपचार केंद्रे सुरू होणार

अमरावती, दि. 26 : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत तिवसा येथील ट्रॉमा केअर सेंटरसह मोर्शी व दर्यापूर येथेही उपचार केंद्रे सुरु होणार आहेत. शहरातही उपचारांसाठी आवश्यक रुग्णालये खासगी रुग्णालये आदी ठिकाणी खाटांची संख्या वाढवावी , असे निर्देश विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे दिले.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकार, डॉ. विशाल काळे, डॉ. जयश्री नांदुरकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिकाधिक करावे. सध्या स्थानिक दोन्ही प्रयोगशाळांतून अहवाल प्राप्त होत आहेत. पुढे आवश्यकता भासल्यास अकोल्याहूनही अहवाल प्राप्त करून घेता येतील. ग्रामीण भागातही पुरेशा आरोग्य सुविधा उभाराव्यात व जनजागृती करावी, असे निर्देश श्री. सिंह यांनी दिले.
तिवसा येथे 50, तसेच मोर्शी व दर्यापूर येथे प्रत्येकी 25 याप्रमाणे एकूण 100 खाटा वाढतील. खासगी रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्यात येईल. तिथेही साधारणत: 100 खाटा अतिरिक्त उपलब्ध होतील. सारीचे पेशंट वाढत असल्याचे दिसते. त्यामुळे यंत्रणा सुसज्ज करण्यात येत असल्याचे श्री. नवाल यांनी सांगितले.
नियमभंग करणा-यांवर पोलीस, महापालिका व इतर यंत्रणांकडून वेळोवेळी कार्यवाही होत आहे. आशासेविकांकडून सर्वेक्षणाचे कामही होत आहे.  यंत्रणेवरचा ताण वाढला असून, कर्मचा-यांतही बाधितांचे प्रमाण वाढत आहे. यादृष्टीने निर्बंध कडक व्हावेत किंवा कसे, याबाबतही सर्व परिस्थिती पुन्हा तपासून निर्णय घेतला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Back to top button