वरुड/दि. २९ – तालुक्यातील वाई शेतशिवारामध्ये शेतामध्ये राहात असलेल्या ७० वर्षीय वृध्द महिलेचा अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना गेल्या २० दिवसांपुर्वी घडली होती, याप्रकरणी अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने २५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणात केवळ दारु दिली नाही म्हणुन वृध्देचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, तालुक्यातील वाई शेतशिवारामध्ये शेतामध्ये राहात असलेल्या ७० वर्षीय वृध्द रमीया दलसु युवनाते हिच्या डोक्यावर भारी हत्याराने मारुन तिचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी शेंदुरजनाघाट पोलिसांनी कलावंती देवराव यूवनाते (३७) रा.पेंडुनी (मध्यप्रदेश) यांचे फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
७० वर्षीय वृध्दा खुन कोणी आणि कशासाठी? केला याबाबत तर्कवितर्क काढले जात असतांना शेंदुरजनाघाट पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. विशेष म्हणजे मृतक रमीया ही गेल्या अनेक दिवसांपासुन दारु विक्रीचा व्यवसाय करीत होती, वाई सह परिसरातील मद्यपी सतत तिच्या झोपडीवर ये-जा करीत होते. यातील आरोपी अमर कन्हैया फरकडे (२५) याला सुध्दा दारु पिण्याचा छंद होती परंतु तो सतत या वृध्द महिलेला त्रास देत असल्यामुळे ती त्याला दारु देत नव्हती परंतु शिव्या देत होती. घटनेच्या आधल्या दिवशी सुध्दा तो तिच्या झोपडीवर गेला आणि तिला दारुची मागणी केली परंतु तिने दारु दिली नाही. अखेर दारु देत नाही म्हणुन अमरने शेजारीच असलेला दगडाने तिला मारण्यास सुरुवात केली आणि त्यातच तिचा अंत झाला. याप्रकरणी उत्तरीय तपासणीनंतर सदर वृध्द महिलेचा मृत्यू दगडाने मारुन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास केला आणि आजुबाजुच्या शेतातील नागरिकांकडून माहीती घेतली असता आरोपीचा शोध सुरु केला. केवळ दारुसाठी अमर कन्हैया फरकडे, वय २५ वर्ष रा.पेंडोनी ता.पांढुर्णा, जि.छिंदवाडा (मध्यप्रदेश) याने तिचा खून केल्याची माहीती मिळाली आणि तेव्हापासून अमर हा फरार होता त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्याच्या गावात जावुन चौकशी केली असता तो काटोल बायपासवरील शशांक वाईन बार अॅन्ड व रेस्टॉरेंटमध्ये कामावर असल्याची माहीती मिळाल्यानंतर पोलिसांनी काटोल गाठून त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून खून करण्यासाठी वापरण्यात आलेले दगड, रक्ताने माखलेले कपडे आणि इतर साहित्य जप्त केले असून आरोपीने खून केल्याची कबूली सुध्दा दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे, ठाणेदार श्रीराम गेडाम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सचिन कानडे, हे.काँ.लक्ष्मण साने, अतूल मस्के, चंद्रकांत कासदेकर, रत्नदीप वानखडे, पंकज गावंडे, पुंजाराम मेटकर करीत आहेत.
तब्बल २२ दिवसांनी का होईना, कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतांना शेंदुरजनाघाट पोलिसांनी आरोपी शोध घेतल्याने आणि प्रकरणाचा छडा लावल्याने पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.