शेतकरी आंदोलन चिघळले
नवीदिल्ली/दि.२६ – कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांनी ’दिल्ली चलो आंदोलन’ पुकारले आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी मागील दोन महिन्यांपासून रस्त्यावर आहेत. आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी पोलिस आणि शेतकर्यामध्ये बाचाबाची झाली. शेतकर्यांनी बॅरिकेडची तोडफोड केली. यामुळे हरयाणा पोलिसांनी शेतकर्यांना रोखण्यासाठी वाटर कॅननचा वापर केला. दिल्ली पोलिसांनी कोरोना काळात शेतकरी दिल्लीत आल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केले, की केंद्र सरकारचे तिन्ही कायदे शेतकर्यांविरोधात आहेत. हे बिल परत घेण्याऐवजी शेतकर्यांना शांतीपूर्ण आंदोलन करण्यापासून रोखले जात आहे. त्यांच्यावर वॉटर कॅनन चालवली जात आहे. शांतिपूर्ण प्रदर्शनाचा त्यांना अधिकार आहे. कृषी कायद्याविरोधात पंजाबच्या हजारो शेतकर्यांनी हरयाणा सीमेत प्रवेश केला. यानंतर, हरयाणा सरकारने पंजाबची सीमा सील केली. शेतकरी संघटनांनी सीमेवर एक लाख शेतकरी येतील, असा दावा केला आहे. चंडीगड-दिल्ली हायवेवर 15 किलोमीटर लांब चक्काजाम झाला. अंबाला हायवेवर एकत्र आलेल्या राज्यातील शेतकर्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाला त्यांच्यावर वॉटरगनचा वापर करावा लागला.
आम्हाला थांबवल्यास दिल्ली हायवे बंद करू, असा इशारा शेतक-यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरयाणा सरकारने आंदोलन सुरू असेपर्यंत राज्यातील कोणतीच बस पंजाबला जाणार नसल्याचा निर्णय घेतला. हरयाणा सरकारने जिंदला लागून असलेल्या नॅशनल हायवे-52ला सील केले आहे. हरयाणाचे डीआयजी ओपी नरवाल यांनी सांगितले, की पंजाब-हरयाणाला जोडणार्या सर्व आठ रस्त्यांना सील करण्यात आले आहे.