नागपूर/दि.३– मेडिकलमधील कोविड वॉर्डात अचानक ऑक्सिजनचे प्रेशर कमी झाल्याचे लक्षात येताच बुधवारी मध्यरात्री 12 रुग्णांना तातडीने दुसऱ्या वॉर्डात स्थानांतरीत करून त्यांचा जीव वाचविण्यात आला. लिक्विड ऑक्सिजनची (liquid oxygen) पाईप लाईन फुटल्याने हा प्रकार झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
मेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 400वर रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या वाढताच कोविड रुग्णांसाठी वॉर्ड क्र. 50,51 व 52 सुरू करण्यात आले. कोविड रुग्णांच्या उपचारात ऑक्सिजन थेरपी महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे या तिन्ही वॉर्डातील प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिजनची सोय करण्यात आली. या वॉर्डाच्या जवळच लिक्विड ऑक्सिजन प्लांट आहे. तिन्ही वॉर्डाला पाईप लाईनद्वारे प्लांटशी जोडण्यत आले आहे. ऑक्सिजन टॅँकर प्लांटपर्यंत पोहचण्यााठी मागील काही दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. याच दरम्यान ऑक्सिजन पाईप लाईन फुटल्याचे सुत्राचे म्हणणे आहे.
बुधवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास या तिन्ही वॉर्डात कमी दाबाने ऑक्सिजन पुरवठा कमी दाबाने होत असल्याचे डॉक्टरांचे लक्षात आल्यावर व तसे आलार्म दिसून आल्यावर तातडीने हालचाली वाढल्या. जे रुग्णांना जास्त दाबाने ऑक्सिजन सुरू होते अशा 12 रुग्णांना तातडीने वॉर्ड क्र. 28 मध्ये हलविण्यात आले. वेळेत घेतलेल्या या निर्णयामुळे या रुग्णांचा जीव वाचला. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.