वडोदरा/दि.८ – गुजरातमध्ये आता आणखी एक नवी दूध डेअरी उभी राहत आहे. या डेअरीचे वैशिष्ट्यं म्हणजे यामध्ये केवळ गाढविणीचे दूध मिळणार आहे. गाढविणीच्या एक लीटर दुधासाठी तब्बल सात हजार रुपये मोजावे लागतील! हे जगातील सर्वांत महागडं दूध ठरू शकते. गुजरातमध्ये हलारी प्रजातीची गाढवे आढळतात. सौराष्ट्रमध्ये या गाढवांची संख्या मोठी आहे. केवळ ओझे वाहण्यासाठी वापरल्या जाणारया या पशूंना दूध देणारया पशुंच्या श्रेणीत टाकण्याचा आणि त्यापासून कमाईचा नवा मार्ग शोधण्याचा मार्ग गुजरात सरकारने शोधला आहे. राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राकडून हरयाणाच्या हिस्सारमध्ये गाढविणीच्या दुधावर एका प्रोजेक्टचीही सुरुवात करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी ‘नॅशनल ब्युरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसोर्सेस‘(NBAGR)ने हलाली प्रजातीच्या गाढवांना नव्या प्रजातीचा दर्जा दिला आहे. गाढवांच्या इतर प्रजातींनाही हा दर्जा मिळालेला आहे; परंतु गुजरातमध्ये आढळलेली ही पहिलीच गाढवाची नवी प्रजात आहे. गुजरातच्या आणंद स्थित ‘आणंद अॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट‘(AAUD)चे डॉ. डी एन रंक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हलारी गाढवे घोड्यांपेक्षा आकाराने लहान असतात; परंतु ती इतर गाढवांपेक्षा मोठी असतात. ती घोड्यांसारखीच दिसतात. गाढवांची ही प्रजाती गेल्या २०० वर्षांपासून हलारा परिसरात आढळून येते. राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्यानंतर या प्रजातींचे संरक्षण आणि त्यांच्या जिन्सच्या संवर्धनासाठीही मार्ग मोकळा होईल. जामनगर आणि देवभूमी द्वारका जिल्ह्याला हलारा क्षेत्र म्हटले जाते. १८,१७६ वर्ग किलोमीटर क्षेत्रात जवळपास एक हजार ११२ गाढवे आढळून येतात. परदेशातही या गाढवाच्या दुधाला मोठी मागणी आहे. या दुधापासून साबण, स्कीन जेल, आणि फेस वॉश बनवले जातात.
आर्युवेदिय महत्त्व
गाढविणीचे दूध अधिक पौष्टिक समजले जाते. या दुधात अॅन्टी एजिंग, अॅन्टी ऑक्सिडेंट आणि इतर तत्व आढळतात. गाढविणीचे दूध शक्तीदायक, स्थिरता आणणारे, उष्ण, किंचित आंबट व खारट असून रुक्ष आहे. त्यात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते. सर्व प्रकारचे वातविकार, अर्धांगवात, पक्षाघात (हातपायावरून वारे जाणे) हे रोग या दुधाने बरे होतात.