मराठी

अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची जबाबदारी खासगी क्षेत्राची

गव्हर्नर दास यांचे मत

मुंबई/दि. १६ – गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदीन लागू करण्यात आली होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे चक्रही थांबले होते. सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून अर्थव्यवस्थेलाही पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. कोरोना महामारीचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यास रिझर्व्ह बँक तयार असल्याची माहिती गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. तसेच अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची गती वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रांनीही योगदान द्यावे असे ते म्हणाले.
उद्योग संघटना फिक्कीने बुधवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जीडीपीच्या आकडेवारीवरून कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला आहे याचे संकेत मिळत असल्याचे दास म्हणाले. “कोरोनानंतर आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रांना रिसर्च आणि इनोव्हेशन, अन्न प्रक्रिया आणि पर्यटन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावण्याची आवश्यकता आहे. पर्यटन क्षेत्रात अनेक व्यापक संधी उपलब्ध आहेत आणि खासगी क्षेत्रांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी देशातील नव्या शैक्षणिक धोरणावरही भाष्य केले. शिक्षण कायमच आर्थिक विकासात आपले योगदान देते. त्यामुळे नवे शैक्षणिक धोरण हे ऐतिहासिक आहे आणि नव्या सुधारणांसाठी ते आवश्यकही असल्याचे दास म्हणाले. पर्यटन क्षेत्रा देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचे इंजिन ठरू शकते. या क्षेत्राला कॅपिटलाईझ करण्याची आवश्यकता आहे.

लोन रिस्टक्चरिंग स्किम तयार करताना लोकांच्या हिताचा आणि त्यांच्या आर्थिक स्थिरतेचा विचार होणे महत्त्वाचे आहे. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कृषी, उत्पादन या क्षेत्रांमध्ये वाढ होताना दिसत आहे आणि पुढील काळात ती वेगाने वाढेल. याव्यतिरिक्त बेरोजगारीही हळूहळू कमी होण्याची शक्यता असून काही क्षेत्रात त्यात घटही झाल्याचे दास यांनी नमूद केले.

Related Articles

Back to top button