मराठी

उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीकडून दुकानदाराला चावा

रेखा यांनी दुकानदाराच्या हाताचा चावा घेतला

पटणा/दि.१७ बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या बहिणीने रागाच्या भरात एका रेशन दुकानदाराचाच चावा घेतल्याची घटना घडली आहे. रेखा मोदी असे त्यांचे नाव आहे. रेखा यांनी एका स्थानिक दुकानदाराकडून दोन पोती तांदूळ विकत घेतला. त्यांना ती पोती घरी आणून देण्यास सांगितले. त्यानंतर त्या दुकानदाराने तो माल घरी आणूनच दिला नाही. त्यामुळे रेखा या त्या दुकानदाराकडे गेल्या आणि ही घटना घडली. ‘तांदुळ घरी का आणून दिला नाही,‘ असा सवाल त्यांनी दुकानदाराला केला, तेव्हा त्यांने समाधानकारक उत्तर दिले नाही, असे रेखाचे म्हणणे आहे. नंतर त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. भांडण झाले.

या भांडणातच रागाने रेखा यांनी दुकानदाराच्या हाताचा चावा घेतला. शेवटी प्रकरण पोलिसांमध्ये गेले. पोलिस ठाण्यात गेल्यावरही रेखा मोदी यांनी प्रचंड गोंधळ घातला. जमिनीवर झोपून त्यांनी न्याय देण्याची मागणी केली. शेवटी पोलिसांनी दुकानदाराला रेखा यांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या वादावर पडदा पडला. रेखा मोदी यांच्यामुळे या आधीही वाद झाले आहेत. रेखा आपली बहिण नाहीत, त्यांचा आपल्या कुटुंबीयांशी काहीही संबंध नाही असे आता सुशीलकुमार मोदी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button