नवी दिल्ली दी ७– बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांआधीच एनडीएत फूट पडली आहे. एनडीएतील घटक पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षा (एलजेपी) ने संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच बिहारमध्ये राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणूक नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली व्हावी, किंवा नाही याबाबत विचारविनिमय करण्यासाठी एलजेपीच्या सदस्यांची आज (सोमवार) बैठक झाली. या बैठकीत जेडीयूसोबत आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखील निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय झाल्याचे कळते; मात्र एनडीएसोबत युती तोडण्याबाबतच्या वृत्ताला एलजेपीच्या सदस्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान हे याबाबत अंतिम निर्णय घेतील असे सुत्रांकडून कळते.
एलजेपीच्या सदस्यांच्या माहितीनुसार, जेडीयूचे सरचिटणीस के. सी. त्यागी चिराग पासवान यांना सल्ला देताना म्हणाले होते, “चिराग यांनी चुकीच्या विधानांपासून दूर रहायला हवे. जर चिराग स्वतःला एनडीचा घटक मानत असतील, तर त्यांनी नितीशकुमार यांच्याविरोधात विधाने करता कामा नये. कारण आमची युती भाजपसोबत आहे एलजेपीसोबत नाही.”
चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांच्यावर आरोप करताना म्हटले होते, कीनितीशकुमार यांच्या पोकळ घोषणाबाजीमुळे एससी-एसटी समाज निराश आहे. राज्यात केवळ एससी-एसटी समाजाच्याच नव्हे, तर कुठल्याही समाजाच्या व्यक्तीची हत्या होता कामा नये. नितीशकुमार यांनी नुकतीच घोषणा केली होती, की, एससी-एसटी समाजातील लोकांची हत्या झाल्यास त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाईल.
-
नितीशकुमारांची प्रतिमा नकारात्मक
बिहारमधील कोरोना संसर्गाची परिस्थिती आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेली पूरस्थिती यामुळे नितीशकुमार यांची नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. दरम्यान, चिराग पासवान आणि नितीशकुमार या दोन्ही नेत्यांमध्ये वाद असून या दोघांनी अनेकदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.