कोविड रूग्णालयातील कर्मचा-यांनी सेवारत राहून केले रक्षाबंधन साजरे
अमरावती, दि. 4 : रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशीही रुग्णसेवा हाच धर्म मानून जिल्हा कोविड रूग्णालयातील कर्मचा-यांनी रूग्णसेवेद्वारे रक्षाबंधन साजरे केले.
रक्षाबंधनाच्या दिवशीही आम्ही सर्व पारिचारिका, रूग्णालयातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी या सर्वांनी आपल्या भावंडांकडे न जाता रुग्णालयात पूर्णवेळ सेवा दिली. भावंडांतील प्रेम वृद्धिंगत करणारा हा सण आहे. भावाने बहिणीची, तसेच बहिणीने भावाची रक्षा करण्याचा संदेश देणारा हा सण आहे. रुग्णालय हेही आमच्यासाठी कुटुंब आहे. येथील प्रत्येकजण आमचे भावंड आहे. या विचारातून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी रूग्णांच्या उपचारात खंड पडू नये म्हणून अविरत सेवा दिली, असे रूग्णालयाच्या व्यवस्थापन टीममधील पारिचारिका ललिता अटाळकर यांनी सांगितले.
क्वारंटाईन सेंटरमध्ये योगशास्त्राचे धडे
आपत्तीच्या काळात आरोग्य व मन:स्वास्थ्य निरामय राहण्यासाठी क्वारंटाईन सेंटर्समध्ये विरंगुळ्यासह मानसिक व्यवस्थापनाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार क्वारंटाईन सेंटर्समध्ये आता योगशास्त्राचे धडेही देण्यात येत आहेत.
उपचाराबरोबरच सकारात्मक वातावरण असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने क्वारंटाईन सेंटर्समध्ये
उपचार सुविधांसह मानसिक व्यवस्थापनासाठी विविध बाबी, विरंगुळ्याची संगीत, टीव्ही आदी साधने सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार आरोग्याबरोबरच मन:स्वास्थ्यही चांगले राहावे, यासाठी आता योगाचे धडेही देण्यात येत आहेत.
आरोग्य विभागातील कर्मचारी सचिन धामणकर हे स्वत: योग प्रशिक्षकही आहेत. वलगाव क्वारंटाईन कक्षात सेवा बजावताना ते कक्षातील दाखल व्यक्तींना दररोज योग प्रशिक्षणही देत आहेत. सहभागींकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. धामणकर यांनी सांगितले. दक्षतेचे सर्व नियम पाळून हा उपक्रम राबविण्यात येतो, असेही ते म्हणाले