समर्थनासह मुख्यमंत्र्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळाने केला मंजूर
राज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अमरावती :- मेळघाट व्याघ्र राखीव मधून जाणाऱ्या अकोला ते खांडवा या मीटरगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात परिवर्तन करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून पर्यायी मार्ग निवडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाला आपले मत कळवले होते. त्यांच्या या मताचे समर्थन करतांना राज्य वन्यजीव मंडळाच्या सर्व सदस्यांनी आज एकमुखाने मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी याचपद्धतीने नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रुपांतर करतांना तो किती जंगलाला प्रभावित करतो, तिथे एलिव्हेटेड ट्रेन करणे शक्य आहे का, याचा विचार करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात वाघांची जपणूक होत आहे पण त्याचबरोबर जलचरांकडेही वन विभाग लक्ष देत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात सुंदर वनसंपदेप्रमाणे समृद्ध जलसृष्टी ही आहे. आपण त्याकडे कसे पहातो हे महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी सागरतटावर कांदळवने देत असलेल्या नैसर्गिक सुरक्षेचा अभ्यास करण्याची सुचना दिली.