प्रतिदिन/दि.१
नगर: ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,’ असे सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना दिले आहे.
दूध दरासाठी भाजपने आज पुकारलेल्या आंदोलनात प्रा. राम शिंदे यांनी सहभाग घेतला होता. आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. शिंदे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना लोखंडे यांनीही त्यांना त्याच भाषेत सुनावले. विशेष म्हणजे लोखंडे आणि शिंदे दोघेही पूर्वी जामखेड-कर्जत विधानसभेवर निवडून गेले होते. लोखंडे यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. शिंदेही दोनदा आमदार होते.
लोखंडे हे एका कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी प्रा. शिंदे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो. आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असे लोखंडे म्हणाले.