मराठी

दुचाकींच्या बाजारात दिवाळीतही चैतन्य राहणार

मुंबई/दि,७  – दुचाकीच्या बाजारात नवरात्रीपासून निर्माण झालेले चैतन्य दिवाळीतही कायम राहणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दसर्‍यात दुचाकींची विक्री 19 टक्क्यांनी वाढली. आठ महिन्यांनंतर खुली झालेली बाजारपेठ, चांगला पाऊस आणि बोनस यामुळे वाहन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीला दुचाकीचा व्यवसाय 25 ते 30 टक्के अधिक होणार असल्याचा विक्रेत्यांना विश्वास वाटतो. विक्रेत्यांनी वाहनांचा स्टॉक करून ठेवल्याने दिवाळीत प्रत्येकाला मनपसंत गाडी मिळू शकेल.
कोरोनामुळे ठप्प झालेल्या दुचाकीच्या बाजाराने नवरात्रापासून जोरदार उसळी घेतली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये आयात आणि निर्यात मिळून तीन लाख आठ हजार 161 दुचाकींची विक्री झाली होती. यंदा ऑक्टोबरमध्ये तीन लाख 82 हजार 121 दुचाकी विकल्या गेल्या. यात 24 टक्के वाढ झाली असल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. दसर्‍यामध्ये पावसामुळे शेतकरी वर्गाला इच्छा असतानाही गाडी नाही घेता आली. आता पाऊस संपला आहे. कापसाला चांगला दर मिळाला. हातात पैसे असल्याने ग्रामीण भागातून दुचाकी खरेदीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. शाळा, कॉलेज आणि काही प्रमाणात ऑफिस बंद असल्याने शहरात विक्री कमी आहे. ती कमतरता ग्रामीण भागातून भरून निघते आहे. तरुणाईऐवजी नोकरदार वर्गाचा दुचाकी घेण्याकडे कल आहे. दुचाकीची ग्रामीण आणि शहराची बाजारपेठ 60:50 अशी आहे.
आता पूर्वीप्रमाणे दुचाकीची अ‍ॅडव्हान्स बुकिंग होत नाही. लोक थेट येऊन खरेदी करतात. दसर्‍यात वाहनांचा तुटवडा निर्माण झाला होता. तोच ट्रेंड कायम राहण्याच्या अंदाजाने आता सर्वांनीच जास्त स्टॉक केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला आवडीचे वाहन मिळेल. स्वस्त झालेले वाहन कर्ज, बोनसचा पैसा यामुळे वाहनांना मागणी वाढण्याची शक्यता आहे.

 

 

Related Articles

Back to top button