गावकऱ्यांनी रात्री ११ वाजता शोधला महिलेचा मृतदेह
दोन्ही मुलींच्या डोळयासमोरुन वाहून गेली आई : गावात शोककळा
वरुड दी १४ – काल (ता.१३) ला रात्री ८ वाजताचे दुचाकीवरुन पुसलाकडे येत असतांना नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह अखेर ५०० मिटर अंतरावरील नाल्याच्या काठावर रात्री ११ सुमारास गावक:यांना आढळून आला. आज अत्यंत शोकाकुल वातावरणात मृतक चंदा धार्मिक यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डोळयासमोर आईला नाल्याच्या पुरात वाहून जातांना पाहून दोन्ही बहिणी मात्र अत्यवस्थच दिसून आल्या.
तालुक्यातील पुसला ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष धार्मिक हे त्यांची पत्नी चंदा, मुलगी लिना व टिनु यांचेसह सावरगाव वरुन पुसला येथे (ता.१३) ला रात्री ८ वाजताचे सुमारास होंडा अॅक्टिवा एम.एच.४० बीए २०६९ क्रमांकाच्या दुचाकीने घरी परत येत असतांना गणेशपूर ते पुसला मार्गावरील पाटा झाडीच्या नाल्यावरुन पुराचे पाणी वाहत होते. हे पुल वळण रस्त्यावर असुन पुलाचा मध्यभाग जमिनीपासुन केवळ २ ते ३ फुट उंच असल्याने पुराच्या पाण्याचा अंदाजच येत नाही. अशातच रात्रीला सुभाष धार्मिक यांना पुलावरील पाण्याचा अंदाज आलाच नाही. यामुळे त्यांची दुचाकी थेट पाण्यात गेली आणि दुचाकी वरील चौघेही पुराच्या पाण्यात पडले. यावेळी चौघांनी सुध्दा एकमेकांचा हात धरुन पाण्याबाहेर निघण्याचा प्रयत्न केला. मात्र चंदा धार्मिक यांचा हात निसटल्याने त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आणि तब्बल ३ तासांच्या शोध मोहीमेनंतर पुलापासुन अर्धा किलोमिटर अंतरावर असलेल्या एका कपाशीच्या शेतात त्या महिलेचा मृतदेह आढळुन आला.
तहसिलदार, ठाणेदार मगन मेहते, जमादार सुरेश गावंडे व त्यांची टिम घटनास्थळावर तळ ठोकून होती. रात्रीच्या सुमारास पुसला, गणेशपूर येथील शेकडो युवकांनी सदर महिलेचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केला. रात्री ११ च्या सुमारास मृतदेह सापडल्यानंतर रात्रीच मृतदेह वरुडच्या शवविच्छेदन गृहामध्ये पाठविण्यात आला. आज सकाळच्या सुमारास मृतदेहाचे शवविच्छेदन करुन दुपारी १ च्या सुमारास पुसला येथील हिंदू स्मशानभुमिध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात दफनविधी पार पडला.
जर हे पुल उंच असते तर कदाचित ही घटनाच घडली नसती व त्या नि:ष्पाप महिलेचा जीव सुध्दा वाचला असता. नशीब बलवत्तर म्हणुन महिलेच्या पतीसह दोन्ही मुलींचे प्राण बचावले. यामुळे मृतक चंदा सुभाष धार्मिक यांना श्रध्दांजली म्हणुन तरी आता प्रशासनाने नाल्यावर त्वरीत उंच पुल बांधुन धार्मिक कुटुंबियांना तातडीने आर्थीक मदत करण्याची मागणी पुसला, गणेशपुर येथील नागरिकांनी केली आहे.