मराठी

रतन इंडिया मधील राख वाहून नेणाऱ्या वाहनांची चाके थांबली

राख भरण्यासाठी अतिरिक्त दर आकारत असल्याचा आरोप

  • स्वतंत्र पोकलँडद्वारे राख भरण्याची मागितली परवानगी

  • व्यवस्थापन आणि पोकलँड मालकाचे साटेलोटे

अमरावती दि.१३- रतन इंडिया प्रकल्पामध्ये निर्माण होणारी राख पोकलँडद्वारे  वाहनांमध्ये भरण्यासाठी  अतिरिक्त दर आकारण्यात येत असल्याने अमरावती वीटभट्टी असोसिएशनच्या ७० वाहनमालकांनी व वीटभट्टी व्यावसायिकांनी व्यवस्थापन आणि पोकलँड मालकाच्या मनमानीला कंटाळून आजपासून चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. आमची वाहने भरण्यासाठी स्वतंत्र पोकलँडला परवानगी द्यावी अन्यथा यापुढे एकही वाहन राख घेऊन जाणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
जिल्ह्यातील शंभर पेक्षा अधिक व्यावसायिक विटा बनविण्यासाठी येथील राख स्वतःच्या वाहनांनी घेऊन जातात.राख घेऊन जाण्यासाठी प्रकल्पाने जी नियमावली ठरविली असून त्याच नियमावलीच्या आधारे व्यावसायिक येथील राख वाहनांद्वारे घेऊन जातात प्रत्यक्षात वाहने भरून देण्याची जबाबदारी ही प्रकल्प व्यवस्थापनाची आहे मात्र व्यवस्थापनातील एका अधिकाऱ्याने राख भरण्यासाठी स्वतःच्या मेव्हण्याचा पोकलँड येथे लावला असून व्यावसायिकांकडून पाचशे ते सातशे रुपये दर आकारण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी अतिरिक्त पोकलँडची गरज असल्याचे व्यावसायिकांनी व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिले.शिवाय दर परवडत नसल्याने आम्ही असोसिएशनच्या वतीने पोकलँड उपलब्ध करतो तशी परवानगी देण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन एका महिन्यांपूर्वी व्यावसायिकांनी दिले होते परंतु संबधीत पोकलँड मालक हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याने तसेच प्रकल्पातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याने व्यावसायिकांच्या मागणीवर कोणतीच प्रतिक्रिया दिली गेली नाही शेवटी आज(मंगळवारी)प्रकल्पाचे उपाध्यक्ष कर्नल लोकेशसिंग यांच्याशी व्यावसायिकांनी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता कोणताही सकारात्मक निर्णय न दिल्याने आज संतप्त वीटभट्टी व्यावसायिक व वाहन मालकांनी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली असून प्रवेश द्वारासमोर सर्व वाहने उभी करण्यात आली आहे.
उद्या जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन देण्यात येणार असून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी अमरावती वीटभट्टी असोसिएशनचे देविदास बांडाबुचे,गजानन तिजारे, धीरज चौहान, राजू चिरडे, राजेंद्र लाड, किशोर अंबाडकर, मोहन दोरोडी, कैलाश रोतोडे, सागर अंबाडकर, मयूर दारोकार ,अजय मोरवाल ,प्रवीण संभे ,प्रवीण दुधे, सुधीर अंबाडकर,सूर्यभान पचारे ,जावेद खान, मोहम्मद शमी, इरफान शहा, प्रभुदास सूने, हर्षद इंगोले,विनोद दातीर, देविदास बांडाबुचे, बलवीर चव्हाण तुषार दातीर आदींनी दिला आहे.
Back to top button